मुंबई - राज्य सरकार वेळोवेळी ठरवलेल्या शुल्कापेक्षा जास्त शुल्क आकारू नये असे आदेश सर्वच शाळांना देत असले तरी बहुतेक शाळांमधून अनेक प्रकारे विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त शुल्क घेण्यात येत आहे. अश्याच एका प्रकरणात अतिरिक्त शुल्क आकारल्या प्रकरणी घाटकोपर पश्चिम येथील सुप्रसिद्ध फातिमा हायस्कूलविरुद्ध घाटकोपर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ५ वर्षांपूर्वी पालकांनी मानवी हक्क आयोगाकडे तक्रार केली होती. त्यांनी दिलेल्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
घाटकोपर पश्चिम येथे असलेल्या व विद्याविहार रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेस असलेल्या फातिमा हायस्कूल शाळेत प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांना प्रयत्न करावे लागतात. गेल्या अनेक वर्षांपासून शाळेच्या प्रशासनाकडून एकूण शुल्क वगळता विविध खेळ आणि काही उपक्रमांच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून महिन्याला दीड ते दोन हजार घेत होते. त्याची कसलीही पावती विद्यार्थ्यांना दिली जात नव्हती. तसेच नवीन प्रवेशासाठीदेखील शाळेकडून मोठी रक्कम घेतली जात असे. त्याबाबत काही पालकांनी घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र त्या वेळी पोलिसांनी थातुर माथूर कारवाई केली होती. शाळेवर योग्य प्रकारे कारवाई होत नसल्याने पालकांनी याबाबत मानवी हक्क आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. गेली पाच वर्षे पालकांनी सातत्याने या प्रकरणाचा पाठपुरावा केल्यावर मानवी हक्क आयोगाने याची दखल घेत फातिमा हायस्कूलवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले. मानवी हक्क आयोगाच्या आदेशानुसार घाटकोपर पोलिसांनी पालकांचे जबाब नोंदवून शुक्रवारी शाळेविरोधात ‘कॅपिटेशन फी अॅक्ट’ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.