मुंबई - दिंडोशीत आगळ्या वेगळ्या पद्धतीने शिवसेनेचा ५१ वर्धापनदिनसप्ताह साजरा करण्यात आहे.येथील महिला आघाडीने महिलांसाठी आयोजित मोफत योगा प्रशिक्षण शिबीराला महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. खासदार गजानन कीर्तिकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज सायंकाळी आयोजित करण्यात आल्याची माहिती आमदार, विभागप्रमुख सुनील प्रभू यांनी दिली.
८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण करण्याची शिकवण तमाम शिवसैनिकांना शिवसेनाप्रमुखांनी दिली होती. तीच शिकवण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नेटाने चालवत आहेत असे आमदार प्रभू यांनी अभिमानाने सांगितले.
दिंडोशी विधानसभा महिला आघाडीच्या वतीने आज सायंकाळी ५ ते ८ या वेळेत कुरारगाव पारेखनगर येथील महापालिका शाळेत महिलांसाठी मोफत योगा मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. घराचा डोलारा यशस्वीपणे सांभाळणाऱ्या दिंडोशीतील तमाम महिला वर्गाचे आरोग्य चांगले आणि ठणठणीत राहण्यासाठी या शिबीराचे खास आयोजन करण्यात आल्याची माहिती आमदार प्रभू यांनी दिली.
तसेच आज सायंकाळी ७ ते ९ आमदार सुनील प्रभू यांच्या कुरार येथील जनसंपर्क कार्यालयात विविध योजनांची माहिती देण्यात आली. यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना व विधवा निवृत्ती वेतन योजना तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना व जेष्ठ नागरिक कार्ड अशा विविध योजनांची माहिती देण्यात आली.
यावेळी विभागसंघटक साधना माने यांच्यासह उपविभागप्रमुख विष्णू सावंत, विधी समिती अध्यक्ष सुहास वाडकर, महिला विधानसभा संघटक अनघा साळकर, महिला उपविभाग संघटक रिना सुर्वे व पूजा चौहान, नगरसेविका विनया सावंत, यांच्यासह दिंडोशीतील शाखाप्रमुख महिला शाखासंघटक, युवासेना व विद्यार्थीसेना तसेच सर्व शिवसैनिक उपस्थित होते.