स्वयंचलीत ब्रिटानिया पंपिंग स्टेशन अद्याप बंद - पालिका प्रशासनाची कबुली - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 June 2017

स्वयंचलीत ब्रिटानिया पंपिंग स्टेशन अद्याप बंद - पालिका प्रशासनाची कबुली


मुंबई / प्रतिनिधी -
मुंबईत पावसात पाण्याखाली जाणाऱ्या हिंदमाता परिसरातील पाण्याचा तात्काळ निचरा करण्यासाठी पालिकेने 100 कोटी रुपये खर्चून स्वंयचलित ब्रिटानिया पंपिंग स्टेशन उभारले. मात्र त्याची पाण्याची पातळी 25 मिलीमीटर ठेवण्यात आल्याने त्याचे स्वयंचलित दरवाजे उघडलेच नसल्याने पंपाच्या सहाय्याने पाण्याचा निचरा करण्यात आला. मागील वर्षी या ठिकाणी 37 पंपांच्या सहाय्याने पाणी उपसा केला होता. यावर्षी 55 पंप येथे लावल्यात येणार आहेत. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या या स्टेशनचा वापर कधी करणार, असा प्रश्न सर्वपक्षीय सदस्यांनी स्थायी समितीत विचारला. तसेच या स्टेशनबाबत खुलासा करण्याची मागणी केली. दरम्यान, येत्या पुढील स्थायी समितीच्या बैठकीत खुलासा करण्याचे अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी मान्य केले.

मुंबईत पावसाळ्यात सखल भागात दरवर्षी पाणी साचते. या पाण्याचा त्वरित निचरा होण्यासाठी पालिका प्रशासनाने मुंबईत सात ठिकाणी पंपिंग स्टेशन उभारण्याचा निर्णय घेतला. यात हाजीअली, इर्ला, ब्रिटानिया, लव्हग्रोव्ह, क्लिव्हलँड, गझरबंध, माहुल व मोगरा पंपिंग स्टेशनचा समावेश आहे. यापैकी गझरबंध पंपिंग स्टेशनचे काम प्रगती पथावर आहे. तर मोगरा व माहुल पपिंगचे काम प्रस्तावित आहेत. तर इतर पंपिंग कार्यान्वित झाले आहे. मात्र, वरळी येथील लव्हग्रोव्ह आणि क्लिव्हलँड पंपिंगच्या कामाला कंत्राटदार युनिटी एम अँड पी -डब्ल्यू पीके कन्सोट्रीसम विलंब केला. यामुळे लव्हग्रोव्हसाठी 5 कोटी 45 लाख 79 हजार तर क्लिव्हलँड प्रकल्पासाठी 3 कोटी 89 लाख 9 हजार रुपये, असा एकूण 9 कोटी 34 लाख 89 हजार रुपयांचा दंड पालिकेने ठोठावला. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी आला असता भाजपने यावर हरकत घेतली. कंत्राटदाराने चूकीच्या पद्धतीने काम केले आहे. यामुळे पालिकेचे कोट्यवधी रुपयाचे नुकसान झाले. मागीलवर्षीच्या पावसाळ्यात ब्रिटानिया पंपिंग स्टेशन उभारले. मात्र यानंतरही दादर, हिंदमाता, शिवडी, वडाळा आदी परिसरात पाणी साचले. मग कोट्यवधी रुपये खर्चून पंपिंग स्टेशन बांधण्यामागे कारण काय, असा प्रश्न भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी उपस्थित केला. यामुद्दावरुन सर्वपक्षीय नगरसेवक आक्रमक झाले. यापूढे पंपिंग स्टेशन परिसरात पाणी साचणार नाही, याची हमी द्यावी, दंड आकारणीसाठी सात वर्षे का लागली. यंदा पंपिंग स्टेशन सुरु झाल्यानंतर ही पंप का वाढविण्यात येत आहेत. कंत्राटदार प्रशासनाला वेठीस धरणार असतील तर त्यांना धडा शिकवावा लागले, असा इशारा देत नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले.

पावसाच्या पाणी साचून नागरिकांना त्रास होणार नाही, याची खबरदारी म्हणून पाणी साचणाऱ्या ठिकाणी 310 पंप लावण्यात येणार आहेत. येत्या शनिवारी गझदरबंध पंपिंग स्टेशनचे दोन पंप सुरु होतील. उर्वरित दोन पंप रविवारी सुरु करण्याचे प्रशासनाचे प्रयत्न आहेत. पंपिंग स्टेशनच्या बांधकामास उशीर झाल्यामुळे अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यांच्याकडून उत्तर आल्यानंतर दोषी आढळून येणाऱ्या संबंधितांवर कारवाई केली जाईल. मात्र, यातून कोणाचीही सुटका होणार नाही, अशी ग्वाही सिंघल यांनी दिली.

दोन दिवसात गझदरबंध पंपिंग स्टेशन सुरु होणार -
पावसाच्या पाण्याचा तात्काळ निचरा करण्यासाठी उभारण्यात आलेले गझदरबंध पंपिंग स्टेशन येत्या 24 जूनपासून सुरु होणार आहे. या पंपिंग स्टेशनचे दोन पंप शनिवारी तर उर्वरित दोन पंप रविवारी सुरु होतील. मात्र, स्टेशन उभारणीस कंत्राटदारांनी दिरंगाई केल्यास कंत्राटदाराला दंड आकारला जाईल. यातून कोणाचीही सुटका होणार नाही, असे स्पष्टीकरण पालिका अतिरिक्त आयुक्त विजय सिघंल यांनी स्थायी समितीत केले.

Post Bottom Ad