मुंबई ( प्रतिनिधी ) – सोन्याची अंडी देणा-या मुंबई पालिकेत गेल्या एक महिन्यापासून रेंगाळत असलेला पालिका विरोधीपक्षनेतेपदाचा गुंता अखेर सुटला आहे. तब्बल एक महिन्या नंतर विरोधी पक्ष नेते म्हणून रवि राजा यांची नियुक्ती केल्याची घोषणा महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केली. पालिकेत दोन नंबरचा पक्ष असलेल्या भाजपने हे पद स्वीकारण्यास नकार दिल्याने अखेर तिस-या क्रमांकाच्या काँग्रेस पक्षाला विरोधीपक्षनेते पद देण्यात आले आहे. मुंबई पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच तिस-या क्रमांकाच्या पक्षाला विरोधी पक्षनेते पद मिळाल्याची नोंद पालिकेच्या रेकॉर्डवर झाली
पालिका महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीनंतर विरोधीपक्षनेतेपदाची खुर्ची महिनाभर रिकामी होती. पालिकेत संख्याबळानुसार दोन नंबरचा पक्ष असलेल्या भाजपने कोणत्याही पदाची निवडणूक लढवणार नाही, अशी याआधीच घोषणा केली होती. त्यामुळे विरोधीपक्षनेतेपदही स्वीकारणार नसल्याचे भाजपने मागील सभेत स्पष्ट केले होते. मात्र कायद्यानुसार दोन नंबरचा पक्ष असलेल्या पक्षालाच विरोधीपक्षनेतेपद देता येत असल्याने चिटणीस विभागापुढे हा तिढा कायम होता. काँग्रेसचे गटनेते रवी राजा यांनी दोन नंबरच्या पक्षाने हे पद न स्वीकारल्यास त्यानंतरच्या संख्याबळ असलेल्या पक्षाला हे पद मिळावे असा हरकतीचा मुद्दा मांडून दावा केला होता. त्यानंतरही भाजपने आम्ही पहारेक-याची भूमिका बजावणार असून कोणतेही पद स्वीकारणार नसल्याने विरोधीपक्षनेते पदही नको, असे भाजपने सभागृहात स्पष्ट केले. त्यावर महापौर विश्वनाथ महाडेश्वर य़ांनी विधी खात्याचा कायदेशीर सल्ला घेऊन याबाबत निर्णय़ घेतला जाईल असे जाहिर केले. कायद्यातील तरतूदीनुसार महापौरांनी दोन नंबरच्या पक्षाला पत्र पाठवून विरोधी पक्षनेतेपदासाठी निमंत्रित केले होते. दुसऱ्या क्रमांकावरील भाजपाने नकार दिल्यास या पदासाठी इच्छुक नसल्याचे कळवल्य़ास तिस-या क्रमांकाच्या पक्षाला निमंत्रित करण्यात यावे असे मत विधी खात्याने नोंदवले. त्यानुसार मंगळवारी महासभेत रवी राजा यांनी विधी खात्याने दिलेल्या अहवालानुसार दुस-या क्रमांकांवर असलेल्या पक्षाने नकार दिल्यास तिस-या क्रमांकाच्या पक्षाला या पदासाठी निमंत्रित करावे याकडे पत्र देऊन लक्ष वेधले. अखेर भाजप हे पद स्वीकारण्यास इच्छुक नसल्याने नियमानुसार विरोधीपक्षनेते पदी काँग्रेसचे रवी राजा यांच्या नावाची घोषणा महापौर महाडेश्वर यांनी केली. त्यामुळे मागील महिनाभर विरोधीपक्षनेते पदाचा असलेला तिढा अखरे सुटला आहे.
>
चौकट >>>>
> विरोधी पक्षनेते पदावर दावा करणार नाही - मनोज कोटक
> पालिका ही देशात सर्वात मोठी पालिका म्हणून गणली जात आहे या पालिकेत व सभागृहामध्ये पारदर्शक काम व्हावे ही आमची भूमिका राहणार आहे. पालिका विरोधी पक्षनेते पदावर दावा सांगणार नाही. मात्र विरोधी पक्षनेते पद म्हणून चांगले काम करावे अशी प्रतिक्रिया भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी दिली
No comments:
Post a Comment