मुंबई (प्रतिनिधी)- चेंबूर येथील रस्त्याचे दुरुस्तीचे कारण पुढे पालिकेने सुमारे २०० झाडे तोडण्याचा निर्णय घेतला आहे. वृक्ष प्राधिकरणाने ही वृक्ष तोड करण्यास मंजुरी दिली आहे. मात्र नागरिकांनी या बेसुमार वृक्ष तोडीला विरोध केला असून ही वृक्षतोड थांबवावी, यासाठी पालिका आयुक्तांना पत्रव्यवहार केला आहे.
चेंबूर येथील एन. बी. पाटील मार्गावरील केळकरवाडी रस्त्याच्या दुरुस्तीचे काम पालिकेने घेतले. या कामात आंबा, नारळ, बांबू आणि पाम अशाप्रकारची लहान- मोठी २०० झाडे बाधीत ठरत आहेत. त्यामुळे ही झाडे तोडण्यास वृक्ष प्राधिकरणाने नुकतीच मंजुरी दिली आहे. तशा नोटीस संबंधीत झाडांवर प्रशासनाकडून चिटकवल्या आहेत. या नोटीस पूर्णतः चुकीच्या असून रस्त्याचे दुरुस्ती काम यापूर्वीच पूर्ण झाले आहे. शिवाय ही झाडे रस्त्याच्याकडेला असल्याने ती अडथळा ठरण्याचा प्रश्न येत नाही. त्यामुळे आयुक्तांनी या ठिकाणची पाहणी करावी आणि संबंधित बेसुमार वृक्षतोड वाचवावी, अशी मागणी करणारे पत्र स्थानिक नागरिकांनी महापालिका आयुक्तांना पाठवले आहे. तर नगरसेविका डॉ. सईदा खान यांनी पालिका आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेऊन संबंधीत वृक्षतोड वाचविण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभी केली जाणारी वाहने त्वरित हटवावीत आणि रस्ता मोकळा करुन द्यावा, अशी मागणी केली. दरम्यान, बाधित ठरणाऱ्या झाडांची माहिती घेऊनच पुढील कार्यवाही केली जाईल, असे आश्वसन आयुक्तांनी दिल्याचे खान यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment