मुंबई ( प्रतिनिधी ) – पालिका क्षेत्रात स्वच्छ भारत अभियानांतर्गत विविधस्तरीय कार्यवाही करण्यात येत असून या अंतर्गत प्रामुख्याने उघड्यावरील शौचविधीचे शहरातून निर्मूलन करणे, शहरात निर्माण होणा-या घन कच-याची शास्त्रोक्त पद्धतीचा अवलंब करुन विल्हेवाट लावली जात आहे या अभियानांतर्गत ३१ मार्च २०१७ पर्यंत पालिकेच्या पुढाकाराने एकूण ११ हजार ६९६ शौचकूपांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. तसेच यापैकी सार्वजनिक व सामुदायिक शौचालयांमध्ये वीज व पाणी पुरवठासुरु झाल्याने संबंधित परिसरातील नागरिकांची सोय झाली आहे, अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन खात्याचे प्रमुख अभियंता सिराज अन्सारी यांनी दिली आहे.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत ३१ मार्च २०१७ पर्यत पालिकेच्या पुढाकाराने १ हजार १६८ वैयक्तिक घरगुती शौचालये, ९ हजार ७८७ सामुदायिक शौचकूपे तसेच ७४१ सार्वजनिक शौचकूपे; यानुसार एकूण ११ हजार ६९६ शौचकूपे बांधण्यात आली आहेत. परिणामी आता मुंबईतील प्रत्येक नागरिकाला त्याच्या घरापासून साधारणपणे ५०० मीटरच्या परिघामध्ये सार्वजनिक शौचालयाची व्यवस्था उपलब्ध झाली आहे. तसेच पालिकेच्या पुढाकाराने करण्यात आलेल्या विविधस्तरीय कार्यवाहींमुळे शौचालयांच्या नियमित वापरात मोठी वाढ झाली आहे, असेही अन्सारी यांनी सांगितले आहे केंद्र शासनाच्या निर्देशांनुसार राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून ०२. ऑक्टोबर २०१४ पासून महापालिका क्षेत्रात 'स्वच्छ भारत अभियान' राबविण्यात येत आहे. हे अभियान महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीपर्यंत २ ऑक्टोबर २०१९ पर्यंत राबविण्यात येणार आहे. यादरम्यान पालिकेच्या पुढाकाराने विविधस्तरीय कार्यवाही करण्यात येत आहे. यामध्ये प्रामुख्याने घरगुती व सामुदायिक शौचकूपांचे निर्माण करणे, शास्त्रोक्त पद्धतीचा अवलंब करुन कचरा व्यवस्थापन करणे इत्यादी बाबींचाही समावेश आहे
No comments:
Post a Comment