मुंबई (जेपीएन न्यूज) - महापालिका शाळांमध्ये सागवानी लाकडाच्या टेबल, खुर्च्यां खरेदीवरुन सेना- भाजपमध्ये पहिली ठिगणी पडली. पारदर्शकतेचा मुद्दा पुढे करत भाजपने प्रस्ताव रोखून धरला. यावेळी सागवानी खुर्च्यांएेवजी अॅल्युमिनियम किंवा स्टीलच्या पर्यायी मार्गांचा वापर करा, अशी उपसूचना मांडली. या उपसूचनेला विरोधकांनी पाठिंबा दिल्याने भाजपने हा प्रस्ताव बहुमताने दप्तरी दाखल करण्यास शिवसेनेला भाग पाडले. यामुळे सेनेवर नामुष्की ओढवली.
पालिकांच्या शाऴांत सागवान लाकडाच्या 2438 टेबल - खुर्च्या खरेदीचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर मंजुरीसाठी आला होता. याप्रस्तावाला भाजपचे पालिका गटनेते मनोज कोटक यांनी विरोध करत सागवान लाकडाच्याच खुर्च्या कशाला? बदलत्या काळानुसार अॅल्युमिनियम किंवा स्टीलच्या खुर्च्या का नाही, असा सवाल केला. सागवान लाकूड टीकाऊ असते, शिवाय रिपेरिंगही करता येते. त्यामुळे हा प्रस्ताव मंजूर करावा अशी भूमिका शिवसेनेच्या नगरसेवकांनी लावून धरली. भाजपही सागवान लाकडाच्या खुर्च्या- टेबल खरेदीच्या विरोधात ठाम राहिल्याने या दोन्ही पक्षांमध्ये ठिणगी उडाली. त्यात विरोधकांनीही भाजपच्या भूमिकेचे समर्थन केल्य़ाने सत्ताधारी शिवसेना एकाकी पडली. स्टील किंवा अॅल्युमिनीयमचे फर्निचर की सागवान लाकडाचे यावर बराचवेळ शिवसेना -भाजपमध्ये खडाजंगी झाली. हे लाकूड सागवानच असेल का? त्याचे मार्केट सर्व्हेक्षण केला आहे का शिवाय जून मध्ये शाळा सुरू होणार असताना प्रस्ताव उशिरा का आणला आदी प्रश्न विचारून प्रस्तावावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. यावेळी विरोधकांनीही भाजपच्या भूमिकेचे समर्थन केले. प्रस्ताव रोखण्यासाठी भाजपचे नगरसेवक प्रभाकर शिंदे यांनी उपसूचना मांडून प्रस्ताव दप्तरी दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर मतदान घेण्यात आले. मात्र बहुमताच्या जोरावर भाजपची सरशी झाली. सत्ताधारी शिवसेनेला मात्र प्रस्ताव दप्तरी दाखल करून हार पत्करावी लागली.
भाजपाला पर्यावरणाचा पुळका कधीपासून -
मुंबईमध्ये मेट्रोच्या बांधकामासाठी हजारो झाडांची कत्तल करणाऱ्या भाजपाला पर्यावर्णाचा पुळका कधी पासून येऊ लागला. विद्यार्थ्यांना टेबल आणि खुर्च्या मृत झाडांपासून बनवल्या जातात, त्यासाठी जिवंत झाडे कापली जात नाहीत. मेलेल्या झाडांपासून बनवण्यात येणाऱ्या वस्तूंमुळे पर्यावर्णाचा ऱ्हास होतो असे भाजपा म्हणत असेल तर मेट्रोसाठी जिवंत झाडे कापली जाणार असताना भाजपाला पर्यावर्णाची काळजी नाही का ? असा प्रश्न सभागृह नेते यशवंत जाधव यांनी उपस्थित केला आहे.