पुन्हा शिवसेना भाजपमध्ये 'सामना' - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 April 2017

पुन्हा शिवसेना भाजपमध्ये 'सामना'


केंद्रात आणि राज्यात भाजपाचे सरकार आहे. भाजपाच्या सरकारला मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने पाठिंबा दिला आहे. मुंबई महापालिकेतही शिवसेना भाजपाची युती होती. परंतू मुंबई महापालिकेची २०१७ ची निवडणूक बघून भाजपाने मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेच्या विरोधात आरोप करण्यास सुरुवात करून शिवसेनेला कोंडीत पकडण्यास सुरुवात केली. शिवसेनेवर भ्रष्टाचाराला खतपाणी घालत असल्याचा आरोप करण्यात आला. याचा फायदा महापालिका निवडणुकीत भाजपाला झाला.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या आधी वर्षभर शिवसेनेवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांनी भाजपाची बाजू भक्कम झाली. निवडणुकीत भाजपाचे मागील महापालिकेत ३२ सदस्य असलेली भाजपाचे ८२ सदस्य झाले. शिवसेनेला म्हणावा तसा फायदा झाला नसला तरी ७५ सदस्यांचे ८४ सदस्य निवडून आले. दोन्ही पक्षांचे समान सदस्य संख्या असल्याने मुंबईत महापौर कोणाचा यावरून चुरस निर्माण झाली.

परंतू ऐनवेळी भाजपाने महापौर पदापासून सर्वच पदाच्या निवडणूका लढवण्यापासून माघार घेतली. राज्यातली मुख्यमंत्री पदाची खुर्ची वाचवण्यासाठी भाजपाने मुंबई महापालिकेची सत्ता शिवसेनेला बहाल केली. राज्यात भाजपा आणि महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. मात्र दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात एकही संधी सोडत नसल्याचे दिसत आहे. दोन्ही पक्ष एकमेकांना कोंडीत पकडत असल्याने राज्यातील आणि मुंबईमधील नागरिकांची मात्र चांगलीच करमणूक होत आहे.

नुकत्याच संपन्न झालेल्या विधिमंडळ अधिवेशनाच्या सुरुवातीला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शिवसेनेने भाजपाला कोंडीत पकडले होते. परंतू नंतर शिवसेनेने तडजोड करण्याची भूमिका घेतली. शिवसेनेच्या तडजोडीच्या वृत्तीमुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही. मात्र भाजपाला राज्याचा अर्थसंकल्प मांडण्याची मुभा मिळाली. आता नुकतेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भाजपा प्रणित एनडीएच्या बैठकीला उपस्थित राहिले.

या बैठकीत राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराला शिवसेनेने आपला पाठिंबा असल्याचे जाहीर केले आहे. याच दरम्यान मागील मुंबई महापालिकेची मागील टर्म संपताना सुधार समितीत मंजूर झालेले गच्चीवरील हॉटेल आणि नाईट मार्केट हे दोन्ही प्रस्ताव पालिकेने एप्रिल महिन्यात होणाऱ्या महासभेच्या पटलावर मंजुरीसाठी ठेवले आहेत. शिवसेना आणि भाजपा दोन्ही पक्ष कधी एकमेकांच्या विरोधात तर भूमिका घेत असल्याने महापालिकेच्या सभागृहात हे दोन्ही पक्ष या प्रस्तावावर काय भूमिका घेतात याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.

गच्चीवरील हॉटेल आणि नाईट लाईफ हे दोन्ही प्रस्ताव शिवसेना आणि भाजपासाठी प्रतिष्ठेचे आहेत. शिवसेना युवाप्रमुख आदित्य ठाकरेंच्या संकल्पनेतील नाईट लाईफचा प्रस्ताव भाजपने पाठिंबा न दिल्याने बारगळला होता. नाईट मार्केटला सुधार समितीत मंजुरी मिळाल्याने फेरीवाला धोरणात या निर्णयाची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. तर गच्चीवरील हॉटेल सुरू करण्यासाठी पालिकेने जाचक अटी, किचकट शर्थी घातल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे यांचे स्वप्न धुळीस मिळण्याची शक्यता आहे.

प्रस्ताव मंजूर करताना दोन्ही पक्षांचे संख्याबळ समान असल्याने बहुमताने प्रस्ताव मंजूर करण्यासाठी विरोधी पक्षांच्या मतावर सेना व भाजपची मदार अवलंबून राहणार आहे. शिवसेना नगरसेवकांना गच्चीवरील हॉटेलचा प्रस्ताव कोणत्याही प्रकारे मंजूर करण्यासाठी झगडावे लागणार आहे. गच्चीवरील हॉटेल आणि नाईट लाईफच्या निमित्ताने दोन्हीं पक्षांमध्ये खडाजंगी होण्याची शक्यता आहे. विधीमंडळ आधिवेशनानंतर भाजपापुढे नांगी टाकणारी आणि राष्ट्रपती पदासाठी भाजपाला पाठिंबा देणारी शिवसेना आता काय भूमिका घेते याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.

अजेयकुमार जाधव
मो. ९९६९१९१३६३

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad