मुबई, दि. 11 - मुंबईतील गिरणीच्या जागेवर असणाऱया चाळींना फंजिबल एफएसआय देण्याचा निर्णय घेतल्यामुळे आता या रहिवाशांना ३०० चौरस फुटाऐवजी ४०५ चौरस फुटाची घरे मिळतील. आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी दिली. या निर्णयाचा फायदा मुंबईतील सुमारे सहा ते सात हजार कुटूंबांना होणार आहे.
मुंबईतील परेल, लालबाग, भायखळा, नायगाव, चिंचपोकळीसह गिरणगाव परिसरात असणाऱ्या बॉम्बेडाईंन, टाटा, श्रीराम मिलसह अनेक मिलच्या जागांवर चाळी असून या चाळींचा पुनर्विकास रखडला आहे. आज याबाबत मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेतली. या बैठकीला आमदार कालिदास कोळंमकर, सुनिल शिंदे आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या चाळींच्या पुर्नविकासात त्यांनाही अन्य पुर्नविकासाच्या योजनांप्रमाणे फंजिबल एफएसआयचे फायदे देण्यात यावेत अशी मागणी आमदार अॅड. आशिष शेलार यांनी केली. फंजिबल एफएसआय दिल्यास या चाळींच्या पुनर्विकासाची योजना आर्थिक दृष्टया परवडणाऱ्या तर होतीलच शिवाय रहिवाशांना ३०० चौरस फुट ऐवजी ४०५ चौरस फुटांची घरे मिळू शकतील. त्यामुळे रहिवाशीही पुनर्विकासाला तयार होतील, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांसमोर मांडण्यात आली. ही मागणी मान्य करीत फंजिबल एफएसआयचे फायदे देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतल्याचे प्रसिध्दीमाध्यमांशी बोलातना आमदार आशिष शेलार यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment