मुंबई (प्रतिनिधी)- सुधार समितीत मंजूर झालेले गच्चीवरील हॉटेल आणि नाईट मार्केट हे दोन्ही प्रस्ताव पालिकेने एप्रिल महिन्यात होणाऱ्या महासभेच्या पटलावर मंजुरीसाठी ठेवले आहेत. हे प्रस्ताव मंजूर करताना दोन्हीं पक्षांमध्ये खडाजंगी होण्याची शक्यता आहे. मात्र आता संख्याबळ समान असल्याने विरोधी पक्षांच्या मतावर सेना व भाजपची मदार अवलंबून राहणार आहे. दरम्यान, शिवसेना युवाप्रमुख आदित्य ठाकरेंच्या संकल्पनेतील नाईट लाईफचा प्रस्ताव भाजपने पाठिंबा न दिल्याने बारगळला होता. त्यामुळे शिवसेना नगरसेवकांना गच्चीवरील हॉटेलचा प्रस्ताव कोणत्याही प्रकारे मंजूर करण्यासाठी झगडावे लागणार आहे.
महापालिका निवडणुकीत शिवसेनेला ८४ तर भाजपला ८२ जागा मिळाल्या आहेत. शिवसेनेने अपक्ष नगरसेवकांच्या साथीने पालिकेत सत्ता स्थापन केली. तर भाजपने सत्तेत किंवा विरोधात न बसता पहारेकरी राहण्याची भूमिका घेतली. यामुळे पालिकेच्या विविध समित्यांमध्ये सदस्य संख्या सम- समान झाली. सम संख्येमुळे दोन्हीं पक्ष विरोधी पक्षांना हाताशी घेवून एकमेकांची कोंडी करण्यावर भर देत आहेत. स्थायी समितीत आठवड्यापूर्वी मंजुरीसाठी आलेला सागवानी लाकडाच्या खुर्च्या- टेबल खरेदीच्या प्रस्तावाला भाजपने विरोध केला. विरोधकांनीही भाजपच्या भूमिकेचे समर्थन केले. यामुळे सत्ताधारी शिवसेना एकाकी पडली होती. यावेळी दोन्ही पक्षांमध्ये ठिणगी उडाली. मात्र दुसऱ्याच दिवशी शिवसेनेने कॉंग्रसेच्या मदतीने वचपा काढत भाजपला जशास तसे उत्तर देत गप्प बसण्यास भाग पाडले. यामुळे दोन्हीं पक्षातील दरी रुंदावत असल्याचे दिसून येत आहे. त्यात गच्चीवरील हॉटेल आणि नाईट मार्केटचा प्रस्ताव सभागृहाच्या पटलावर मंजुरीसाठी आल्याने सेना आणि भाजप सामना रंगण्याची शक्यता आहे.
युवा नेत्यांचे स्वप्न भंगणार? - मागीलवर्षीपासून भाजप शिवसेनेला शह देण्याचा प्रयत्न करत आहे. सेनेच्या नाईट लाईफ विरोधात नाईट बाजार, शाळेतील मुलांना टॅबऐवजी डिजिटल एज्युकेशन संकल्पना मांडून भाजपकडून आव्हान दिले. तर राज्य सरकारने आदित्य ठाकरे यांच्या नाईट लाईफच्या प्रस्तावाला विरोध केला, यामुळे सत्तेत असूनही सदर प्रस्ताव सेनेच्या नगरसेवकांना मंजुर करता आले नाही. दरम्यान, नाईट मार्केटला सुधार समितीत मंजुरी मिळाल्याने फेरीवाला धोरणात या निर्णयाची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. तर गच्चीवरील हॉटेल सुरू करण्यासाठी पालिकेने जाचक अटी, किचकट शर्थी घातल्या आहेत. त्यामुळे सेनेचे युवनेते स्वप्न धुळीस मिळण्याची शक्यता आहे.
No comments:
Post a Comment