विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची रक्कम आधार संलग्नित बँक खात्यात जमा होणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

18 April 2017

विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची रक्कम आधार संलग्नित बँक खात्यात जमा होणार


मुंबई, दि. 18 : उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील तंत्रनिकेतन महाविद्यालयांसाठी राबवल्या जाणाऱ्या दोन शिष्यवृत्ती योजनांच्या लाभाची रक्कम आता थेट विद्यार्थ्यांच्या आधारकार्डशी संलग्न असलेल्या बँक खात्यात जमा होणार आहे.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज राज्य शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना शासन अनुदानित आणि खाजगी विनाअनुदानित महाविदयालये/तंत्रनिकेतने मध्ये राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत निवडक व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी केंद्रिभूत प्रवेशप्रक्रियेद्वारे प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांकडून आकारण्यात येणाऱ्या शिक्षण शुल्काच्या 50 टक्के मर्यादेपर्यंतच्या शिक्षण शुल्काची प्रतिपूर्ती देण्यात येते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांकडून आकारण्यात येणाऱ्या शिक्षण शुल्काच्या 50 टक्के मर्यादेपर्यंतच्या शिक्षण शुल्काची प्रतिपूर्तीची रक्कम आता थेट बँक खात्यात जमा होणार आहे. या योजनेनुसार उच्च व तंत्र शिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास, तसेच मत्स्य विभागातील विशिष्ट व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शिक्षण शुल्काची 50 टक्के रक्कम राज्य शासन देते. आता या शैक्षणिक वर्षापासून म्हणजे 2017-18पासून ही रक्कम संबंधित शैक्षणिक संस्थांऐवजी शिष्यवृत्ती स्वरुपात विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.

निवडक व्यावसायिक अभ्यासक्रमांना शासकीय, शासन अनुदानित व विनाअनुदानित आभियांत्रिकी महाविद्यालये/ तंत्रनिकेतनमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी ज्या विद्यार्थ्यांचे पालक अल्पभूधारक शेतकरी आहेत किंवा ज्यांचे पालक नोंदणीकृत मजूर आहेत अशा विदयार्थ्यांकरिता डॉ.पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. अनुदानित अभियांत्रिेकी महाविदयालये आणि तंत्रनिकेतनमध्ये प्रेवश घेणाऱ्या विदयार्थ्यांपैकी ज्यांचे पालक अल्पभूधारक शेतकरी आहेत, अशा विदयार्थ्यांनाही डॉ.पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता योजनेच्या लाभाची रक्कमही बँक खात्यात जमा होणार आहे.

महाविद्यालये, तंत्रनिकेतनांच्या परिसरात संबंधित शैक्षणिक संस्थांना आधार संलग्नीत बायोमॅट्रीक उपस्थिती प्रणाली स्थापित करणे बंधनकारक असेल. दोन्ही योजनांकरीता सर्व विद्यार्थ्यांची संस्थेतील दैनंदिन उपस्थिती पारदर्शीपणे नोंदविणे आवश्यक असेल. तसेच या योजनांतर्गत लाभ घेण्यासाठी संबंधित शैक्षणिक वर्षात इच्छुक अर्जदार विद्यार्थ्यांची प्रवेशित अभ्यासक्रमासाठी किमान 50 टक्के उपस्थिती आवश्यक आहे. शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेंतर्गंत शिष्यवृत्तीची पात्र लाभार्थ्यांना संबंधित शैक्षणिक वर्षाकरिता मंजूर करण्यात येणारी 50 टक्के मर्यादेपर्यंतची शिक्षण शुल्काची रक्कम ही दोन हप्त्यामध्ये लाभार्थी विद्यार्थ्यांस देण्यात येईल.

सदरचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलबध करुन देण्यात आला असून त्याचा संकेतांक201704151048417208 असा आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad