राज्यभरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहास प्रारंभ - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

08 April 2017

राज्यभरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहास प्रारंभ

समाजकल्याण विभागाच्या योजना समता सप्ताहात लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवाव्यात- मधुकर गर्दे

धुळे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित समता सप्ताहाच्या माध्यमातून समाजकल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवावी. त्यांना या योजनांचा लाभ मिळवून द्यावा. लाभार्थ्यांनीही या योजनांचा लाभ घेत प्रगती साधावी, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समितीचे सभापती मधुकर गर्दे यांनी केले.

सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग, सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, धुळे यांच्यातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आजपासून 14 एप्रिल 2017 पर्यंत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. समता सप्ताहाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख, वाल्मिक दामोदर, रमेश श्रीखंडे, सुरेश लोंढे, मधुकर शिरसाट, प्राचार्य अडसुळे, रजिया सुलताना, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त के. जी. बागूल, समाजकल्याण अधिकारी हर्षदा बडगुजर, विलास कर्डक उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

गर्दे म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्य घटना लिहून देशाला आकार देण्याचे महान कार्य केले. त्यांचे कार्य अलौकिक आहे. त्यांच्या या कार्याबद्दल सामाजिक बांधिलकी म्हणून समता सप्ताहात समाजातील सर्व घटकांनी सहभागी झाले पाहिजे.

देशमुख म्हणले, जिल्ह्यात सामाजिक सलोखा व समता कौतुकास्पद आहे. तो वृध्दिंगत करण्याचा संकल्प समता सप्ताहानिमित्त आपण केला पाहिजे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला समतेच्या संदेशाचे दैनंदिन आयुष्यात प्रत्येकाने अनुकरण केले पाहिजे.

मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी शासनाच्या विविध योजना आहेत. या योजनांचे लाभ आता रोखीने थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. यातून आर्थिक उन्नती होवून जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे. त्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करीत शासनाच्या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना मिळवून द्यावा. सर्वश्री कर्डक, श्रीखंडे, शिरसाट, दामोदर यांनी मनोगत व्यक्त करीत मागासवर्गींयांच्या विकासासाठी असलेल्या शासनाच्या विविध योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी हा सप्ताह उपयुक्त ठरेल, असे सांगितले. यावेळी भास्कर अमृतसागर यांनी गीत सादर केले.

बागूल यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी सांगितले, समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती या सप्ताहात देण्यात येईल. विद्यार्थ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील लघुनाट्य, प्रश्नमंजुषा, वादविवाद स्पर्धा होतील. याशिवाय रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी, स्वच्छता अभियान, प्रबोधनपर व्याख्यानांचे आयोजन करण्यात येईल, असे नमूद केले.


सामाजिक समता सप्ताहानिमित्त दलित वस्त्यांत स्वच्छता कार्यक्रम- पी. बी. बच्छाव

औरंगाबाद : जिल्ह्यातील सर्व दलित वस्त्यांमध्ये सामाजिक समता सप्ताहानिमित्त स्वच्छता कार्यक्रम राबविण्यात यावेत, असे आवाहन सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक आयुक्त पी. बी. बच्छाव यांनी केले आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 8 ते 14 एप्रिल 2017 पर्यंत सामाजिक न्याय विभागातर्फे सामाजिक समता सप्ताह राबविण्यात येत आहे. त्यानिमित्त सप्ताहाचा शुभारंभ आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात करण्यात आला. त्याप्रसंगी बच्छाव बोलत होते.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक परिश्रमातून साकारलेल्या भारतीय राज्य घटना आधार मानून मागासवर्ग घटकांच्या विकासासाठी शासनस्तरावरुन अनेकविध योजना राबविल्या जात आहेत. त्याचा फायदा घेण्यासाठी सर्वच मागासवर्ग लोकांनी पुढे आले पाहिजे व आपला विकास साधला पाहिजे. त्याचप्रमाणे ग्रामीण व शहरी भागात सामाजिक सलोखा निर्माण केला पाहिजे, असेही आवाहन बच्छाव यांनी केले.

प्रास्ताविकात सहाय्यक आयुक्त (समाजकल्याण) शिवाजी शेळके यांनी सामाजिक सप्ताहानिमित्त सात दिवसाच्या कार्यक्रमाची रुपरेखा विषद केली. जिल्हा समाज कल्याण अधिकारी डॉ. सतीश मंडावी यांनी आभार मानले. सामाजिक न्याय भवन सभागृहात झालेल्या या कार्यक्राचे दीपप्रज्वलन पी. बी. बच्छाव यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. जिल्हा दक्षता व सनियंत्रण समितीचे सदस्य उत्तमराव गाडेकर, विष्णू काटकर, बसंती लाहोट, अशोक तुसांबड, बबीता कागडा, राजपाल सौदे, विलास चांदणे, जिल्हा माहिती अधिकारी रामचंद्र देठे आदी उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या योगदानामुळे भारताची महासत्ता होण्याकडे वाटचाल- चंद्रकांत सुर्यवंशी

बीड : देशाच्या विकासाचे प्रतिक भौतिक विकास नसून देशाचे समाजस्वास्थ कसे आहे यावर अवलंबून असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलित आणि अस्पृश्य समाजाला मुख्य प्रवाहात आणून त्यांना समानतेचा हक्क मिळवून देण्याचे महान कार्य केले आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या योगदानामुळे भारत महासत्ता होण्याकडे वाटचाल करीत आहे, असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी केले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने आयोजित सामाजिक समता सप्ताहाचा शुभारंभ डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाच्या सभागृहात निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त रवींद्र शिंदे, धर्मराज करपे, अ.रा. देवगावकर, सराफ, जिल्हा माहिती कार्यालयाचे ना.गो. पुठ्ठेवाड यांची उपस्थिती होती.

सुर्यवंशी म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जीवनाच्या प्रत्येक अंगाचा समावेश संविधानामध्ये केला आहे. दलित आणि अस्पृश्य समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणून त्यांना समानतेचा हक्क मिळवून दिला. यासाठी त्यांना समाजातील अनिष्ट रुढी आणि परंपरा यांचा विरोध करावा लागला. चवदार तळ्याचा सत्याग्रह आणि काळाराम मंदीर प्रवेश ही त्याची उहादरणे असल्याचे श्री. सुर्यवंशी यांनी यावेळी नमुद केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर विविध ग्रंथ आणि पुस्तकांच्या वाचनाचा प्रभाव असल्याने समाजाचे मागासलेपण हे अज्ञानामुळे आहे हे ओळखून त्यांनी शिक्षणाचे महत्व समाजाला पटवून दिले. तसेच डॉ. आंबेडकरांनी शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा हा मंत्र दलित आणि वंचित समाजाला दिला. शासन राबवित असलेल्या विविध योजनांचा लाभ उपेक्षित समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविल्यास त्यांची आर्थिक आणि सामाजिक उन्नती होण्यास मदत होईल, असेही सुर्यवंशी यांनी यावेळी सांगितले.

धर्मराज करपे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनामधील सर्वात उत्कृष्ट कार्य म्हणजे संविधान आहे. संविधानामुळे देशातील सर्व जाती धर्मातील लोकांना समतेचा अधिकार प्राप्त करुन दिला आहे. राजर्षी शाहू महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासह डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची सविस्तरपणे माहिती करुन दिली.

प्रास्ताविकात समाज कल्याण सहायक आयुक्त रविंद्र शिंदे यांनी दि. 8 ते 14 एप्रिल या सामाजिक समता सप्ताहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या विविध उपक्रम व कार्यक्रमांची सविस्तर माहिती दिली सूत्रसंचालन अस्मिता जावळे यांनी केले तर आभार बारगजे यांनी मानले.

समता सप्ताहातून सामाजिक न्यायाच्या योजना राबविण्याची प्रेरणा घेऊया- संतोष पाटील
नांदेड : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाच्या निमित्ताने सामाजिक न्यायाच्या योजना परिणामकारकरित्या राबविण्याची प्रेरणा घेऊया, त्यासाठी प्रयत्नशील राहू या, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले.

राज्यभरात आज पासून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह साजरा करण्यात येत आहे. त्यानुसार जिल्हास्तरीय कार्यक्रमात सप्ताहाचा प्रारंभ प्रभारी जिल्हाधिकारी पाटील यांच्या हस्ते सामाजिक न्याय्य भवन येथे करण्यात आला. या कार्यक्रमात ते बोलत होते. समाजकल्याणचे सहायक आयुक्त भगवान वीर, जिल्हा समाजकल्याण अधिकारी यु. डी. तोटावार, समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, बार्टीच्या समतादूत प्रकल्पाचे जिल्हा समन्वयक मुंजाजी कांबळे, वरीष्ठ समाज कल्याण निरीक्षक बापू दासरी आदींची उपस्थिती होती.

पाटील पुढे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य समजून घेण्यासाठी, अनेकदा उजळणी करावी लागेल. राज्यघटनेत अंतर्भूत असलेले स्वातंत्र्य-समता-बंधुता ही महान तत्व प्रणालीही समजून घ्यावी लागेल. तथागत बुद्धांच्या तत्त्वज्ञानातून डॉ. आंबेडकर यांनी समता या तत्त्वाचा अंगिकार केला. पुढे त्यासाठी बौद्ध धर्माचा मार्गही अनुसरला. आज या समता सप्ताहाच्या निमित्ताने पुन्हा एकदा सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्न, योजना, उपक्रमानांही जाणून घेतले पाहिजे. असे प्रयत्न, या योजना ज्या घटकांसाठी आहेत, त्यांच्यापर्यंत पोहचविण्यासाठी एकत्रित प्रयत्न केले पाहिजेत. सामाजिक न्याय्य आणि विशेष सहाय्याच्या योजना परिणामकाररित्या राबविण्यासाठीची प्रेरणाही या समता सप्ताहातून घेतली पाहिजे, असेही ते म्हणाले.

प्रास्ताविकात सहाय्यक आयुक्त वीर यांनी भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनापर्यंत चालणाऱ्या या सामाजिक समता सप्ताहाची रुपरेषा व त्याअंतर्गत होणाऱ्या विविध कार्यक्रम-उपक्रमांची माहिती दिली. शिवानी इंगोले यांनी सूत्रसंचालन केले. समाज कल्याण अधिकारी आऊलवार यांनी आभार मानले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उदघाटन


लातूर : सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय लातूर व 1 हजार मुला/मुलींचे शासकिय वसतिगृह एम.आ.डी. सी. लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भारतरत्न डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या 126 व्या जयंतीनिमित्त सामाजिक समता सप्ताहाचे उदघाटन जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांच्या हस्ते झाले.

सामाजिक समता सप्ताह दिनांक 08 एप्रिल 2017 ते 14 एप्रिल 2017 या कालावधीत साजरा करण्यात येत आहे. शासनाच्या विविध योजनांचा प्रचार व प्रसार, रक्तदान शिबीर, अनुसूचित जातीच्या वस्तीमध्ये स्वच्छता अभियान, वाद विवाद स्पर्धा, व्याख्यानमाला असे विविध उपक्रमाद्वारे सामाजिक सप्ताहात होणार आहेत.

जिल्हाधिकारी म्हणाले, तथागत गौतम बुध्द व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या पायावर आधारीत मानवता वादातून समाजाची प्रगती वर्तमान व भविष्य काळात निश्चित होईल. मानवाला शरीर, मन, आत्मा आवश्यक आहे, तेवढाच स्वाभिमान आवश्यक आहे. हे महापुरुषाचे विचार सदैव तेवत ठेवून समाजाच्या प्रगतीसाठी सर्वांनी प्रयत्न करुया.

उदघाटनप्रसंगी वसतिगृहातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले. येणाऱ्या सप्ताहामध्ये वसतीगृहात विविध कार्यक्रमाचे आयोजन करणार असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. कार्यक्रमाला सहायक आयुक्त बी. जी. अरवत, समाज कल्याण अधिकारी एस. एन. चिकुर्ते, समाज कल्याण अधिकारी एस.टी. नाईकवाडी, गृह प्रमुख पंडीत, गृह प्रमुख चौधरी, गृह प्रमुख गवळी हे उपस्थित होते. प्रास्ताविक सहायक आयुक्त बी. जी. अरवत यांनी केले तर आभार समाजकल्याण अधिकारी एस. टी. नाईकवाडी यांनी मानले. सूत्रसंचालन वसतीगृहातील आनंद कंजे व रमा मगरे यांनी केले. यावेळी वसतीगृहाच्या परिसरात जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले.

सामाजिक समतेची जाणीव सर्वांनी करुन घ्यावी- राजेश पांडे

गडचिरोली : शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने अनुसूचित जातीच्या दुर्बल घटकातील लोकांचा सर्वांगीण विकास होण्याच्या उद्देशाने विविध लोकाभिमूख योजना राबवित आहे. सदर योजनांची माहिती सामाजिक न्याय विभागाकडून नागरिकापर्यंत पोहचावे, यासाठी या सामजिक समता सप्ताहाचे आयोजन केले आहे. मात्र या योजना राबविणाऱ्या यंत्रणांनी सामाजिक समतेची जाणीव ठेवून हा कार्यक्रम यशस्वी करण्याचे आवाहन याप्रसंगी जात पडताळणी पथकाचे उपआयुक्त राजेश पांडे यांनी केले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह दिनांक 8 एप्रिल 2017 ते 14 एप्रिल 2017 या कालावधीत सामाजिक न्याय विभागाव्दारे डॉ. आंबेडकर सामाजिक न्याय भवनात साजरा करण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी पांडे बोलत होते. यावेळी समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विनोद मोहतुरे, फुले आंबेडकर महाविद्यालयाचे प्राध्यापक यादव गहाणे, इतर मागास वर्ग महामंडळाचे व्यवस्थापक एस.पी. बावनकर, सहाय्यक नगरधने प्रामुख्याने उपस्थित होते.

पांडे म्हणाले की, सदर योजना समाजातील तळागाळातील दुर्बल व्यक्ती पर्यंत पोहचण्यासाठी आधी सामाजिक समतेची बिजे मनात रुजवून माणुसकीने वागणे महत्वाचे आहे. याशिवाय माणुस हा प्रगत होऊ शकत नाही.याप्रसंगी सहाय्यक आयुक्त विनोद मोहतुरे, प्राध्यापक यादव गोहणे यांचीही समयोचित भाषणे झाली. प्रास्ताविक विनोद मोहतुरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी पाटील यांनी केले तर आभार सारंग गावंडे यांनी मानले.

भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्‍ताहास प्रारंभ

सिंधुदुर्गनगरी : भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सप्‍ताहाचा शुभारंभ जिल्‍हाधिकारी उदय चौधरी यांच्‍या हस्‍ते दीपप्रज्‍वलन करुन करण्‍यात आला.

येथील सामाजिक न्‍याय भवनाच्‍या सभागृहात आयोजित समारंभात समाज कल्‍याण सहाय्यक आयुक्‍त जयंत चाचरकर, जिल्‍हा माहिती अधिकारी मिलिंद बांदिवडेकर, जिल्‍हा अग्रणी बॅंकेचे व्‍यवस्‍थापक के. बी. जाधव, समाज कल्‍याण निरीक्षक धर्मराज गोसावी, महामंडळाचे समन्‍वयक नंदकिशोर सावळकर आदी मान्‍यवरांच्‍या उपस्थितीत या सप्‍ताहाचा प्रारंभ झाला.

8 एप्रिल ते 14 एप्रिल 2017 या कालावधीत जिल्‍ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन सामाजिक न्‍याय विभागाच्‍या वतीने करण्‍यात आले आहे. या वेळी जिल्‍हाधिकारी उदय चौधरी व मान्‍यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या प्रतिमेस पुष्‍पहार अर्पण करुन अभिवादन केले.

प्रारंभी समाजकल्‍याण सहाय्यक आयुक्‍त जयंत चाचरकर यांनी सप्‍ताहात आयेजित कार्यक्रमांची सविस्‍तर माहिती देऊन उपस्थित मान्‍यवरांचे स्‍वागत केले. या साप्‍ताहानिमित्‍त रक्‍तदान शिबीर, व्‍यसनमुक्‍ती प्रचार कार्यशाळा, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्‍या वस्‍त्‍यांमधून स्‍वच्‍छता अभियान, समाज प्रबोधनपर विषयावर व्‍याख्‍यान आदी कार्यक्रम होणार आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad