मुंबई (प्रतिनिधी) - पालिकेने धार्मिक स्थळांवर कारवाईचा धडाका लावला आहे. न्यायालयाच्या आदेशाचे कारण देत सुरु असलेल्या कारवाई दरम्यान अनेक कायदेशीर धार्मिक स्थळांना नोटीस देण्यात आली आहे. या कारवाईचे पडसाद सोमवारी पालिका सभागृहात उमटले. बेकायदा फेरीवाला अनधिकृत बांधकामांना अभय देणाऱ्या पालिका प्रशासनाने धार्मिक स्थळांना लक्ष्य केले असल्याने या कारवाईंना तात्काळ स्थगिती द्या, अन्यथा होणाऱ्या उद्रेकाला सामोरे जावे, असा प्रशासनाला इशारा देऊन झटपट सभा तहकूब करण्यात आली.
मुंबईतील धार्मिक स्थळांना पालिका नोटीस पाठवून कारवाई करण्याचा घाट सुरू आहे. अनेक ब्रिटीशकालीन मंदीरांचा यात समावेश आहे. पवई येथील आयआयटीच्या समोरील सन १९२४ मधील हनुमानाचे मंदीर पाडण्यासाठी अशाच स्वरुपाची नोटीस पालिकेने बजावली आहे. हे मंदीर पुरातन असल्याने लोकांच्या भावना तीव्र झाल्या आहेत. अनधिकृत बांधकामे पाडण्याचे धाडस न करणाऱ्या प्रशासनाकडून मात्र मंदिरावर कारवाई सुरु आहे. पुरातन मंदिर वाचविण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, असा मुद्दा भाजपचे नामनिर्देशित नगरसेवक श्रीनिवास त्रिपाठी यांनी मांडला. या मुद्द्याला सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाठिंबा दिला. मंदीर, मश्चिद, क्रुझवर कारवाई करण्यासाठी पालिका नोटीस बजावत असल्याने हे प्रकार थांबिवण्यासाठी महापौरांनी दालनात बैठक बोलावावी व प्रशासनाकडून खुलासा मागावा, अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांकडून करण्यात आली. प्रशासन धार्मिक तेढ निर्माण करण्याचे काम करत आहे. हे प्रकार तात्काळ थांबवावेत, अन्यथा प्रशासनाला धडा शिकण्यासाठी लोक रस्त्यावर उतरतील. मोठा उद्रेक निर्माण होईल त्याला प्रशासनाला सामोरे जावे लागेल, असा इशारा नगरसेवकांनी दिला. तसेच प्रशासनाची माणुसकी संपली आहे का, असा प्रश्न उपस्थितीत करून झटपट तहकूबी मांडली. यावेळी धार्मिक स्थळांबाबत वाहतूक किंवा पादचाऱ्यांना खरंच त्रास होत आहे का, याची पाहणी करावी अशा सुचना केल्या.
पालिका सभागृहनेते यशवंत जाधव, स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगांवकर, भाजपचे पालिका गटनेते मनोज कोटक, कॉंग्रेसचे नगरसेवक रवी राजा, सपाचे रईस शेख आदी सर्वपक्षीय नगरसेवकांनी तीव्र शब्दात पालिकेच्या मंदीरावरील कारवाईसंदर्भात निषेध व्यक्त केला. दरम्यान, जनभावनांच्या भावना दुखावल्या आहेत. प्रशासनाने याची दखल घ्यावी, असे निर्देश देत महापौरांनी सभा तहकूबी एकमताने मंजूर केली.
प्रशासन बेकायदा बाधकामांच्या पाठिशी मुंबईतील पुरातन धार्मिक स्थळांवर प्रशासनाकडून कारवाई सुरु आहे. यात रस्ते वाहतूक किंवा पादचाऱ्यांना अडथळा न ठरणाऱ्या स्थळांचाही समावेश आहे. मात्र बेकायदा फेरीवाले व अनधिकृत बांधकामांना प्रशासन राजरोसपणे अभय देत आहे, असा आरोप नगरसेवकांनी केला.
No comments:
Post a Comment