नागपूर, दि. 14 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सामान्य माणसाला सन्मानाचे जीवन देण्यासाठी आयुष्यभर लढा दिला. सर्वांना समान आर्थिक अधिकार देण्याचे त्यांचे विचार होते. त्यांचा हा विचार इतक्या वर्षात रुजू शकला नाही. डिजीटल इंडिया ही मोहीम त्यांचा हा विचार प्रत्यक्षात साकारेल, असे प्रतिपादन त्यांच्या जयंतीदिनी नागपूर येथे अभिवादन करताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले.
नागपूर येथील मानकापूर विभागीय क्रीडा संकूल येथे निती आयोगाने‘नवी अर्थ व्यवस्था आणि नवभारत’ या उपक्रामाचे राष्ट्रव्यापी आयोजन केले होते. याठिकाणी प्रधानमंत्र्यांच्याहस्ते विविध योजना व उपक्रमांचे लोकार्पण झाले. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ट वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद, मानव संसाधन विकास मंत्री प्रकाश जावडेकर, ऊर्जा मंत्री पियुष गोयल (स्वतंत्र प्रभार), गृह राज्यमंत्री हंसराज अहीर, सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता, खा. कृपाल तुमाने,महापौर नंदा जिचकार आदी उपस्थित होते.
प्रधानमंत्र्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली. यावेळी सभागृहातील नागरिकांनी टाळयांचा प्रचंड कडकडाट केला. त्यांच्या मराठी प्रेमाला दाद दिली. बाबासाहेबांच्या जंयतीदिनी दीक्षाभूमीच्या पवित्र धरतीवर नमन करता आले. दीक्षाभूमीची ऊर्जा, प्रेरणा सदैव सोबत राहील. बाबासाहेबांनी दलित, पिडीत, शोषित, वंचितांसाठी काम केले. या घटकाच्या सर्व प्रश्नांचे उत्तर त्यांनी संविधानाच्या स्वरुपात दिले आहे. यामुळे प्रत्येकाला आपल्या जीवनात सकारात्मक कार्य करण्याची संधी व प्रेरणा मिळत आहेत, असे प्रधानमंत्र्यांनी सांगितले.
बाबासाहेबांचे सामाजिक, आर्थिक विचार डिजीटल इंडियाच्या माध्यमातून साकारणार आहे. भीम ॲप त्यासाठी चांगले माध्यम आहे. या ॲपच्या माध्यमातून खिश्यात एक पैसाही न बाळगता आर्थिक व्यवहार करता येईल. कॅशलेस व्यवहाराची ही टेक्नालॉजी विश्वात लोकप्रिय ठरेल. डिजीटल व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी डिजीधन ही योजना राबविली जात आहेत. देशभरात शंभर ठिकाणी डिजीधन मेळावे घेण्यात आले. भ्रष्टाचार, काळेधन संपविण्यासाठी डिजीधन हे सफाई अभियान ठरणार आहे. यासाठी देशातील युवकांनी स्वयंसेवकाच्या भूमिकेतून काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले. कॅशलेस व्यवहारासाठी भीम आधार हे ॲप क्रांतीकारी ठरणार असून व्यापारी व ग्राहकांना या ॲपचा अधिकाधिक वापर करण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा. येत्या उन्हाळी सुट्या यासाठी घालवाव्या. यातून आर्थिक उत्पन्नही मिळणार आहेत. 14 ऑक्टोबरपर्यंत ही मोहीम राबविली जाणार आहे. भ्रष्टाचाराची लढाई लढण्यासाठी या मोहिमेत सहभागी व्हावे. परिवर्तनाचे शिपाई बनावे, असे आवाहनही प्रधानमंत्र्यांनी यावेळी केले.
केंद्र शासनांच्या योजनांची महाराष्ट्र हे उत्तम अंमलबाजवणी करणारे राज्य आहे. यासाठी त्यांनी महाराष्ट्र शासनाचे आभार मानत विकासासाठी सोबत पुढे जावू, असे प्रधानमंत्री म्हणाले. नागपूर येथे लोकार्पण करण्यात आलेल्या कोराडी प्रकल्पाच्या वापरासाठी शहराने भांडेवाडी येथे सांडपाण्यावर प्रकिया करुन पाणी उपलब्ध करुन दिले आहे. हा पर्यावरणपूरक प्रयोग आहे. असे सांगत त्यांनी नागपूरकरांचेही अभिनंदन केले. वीज जीवनाचा अविभाज्य अंग बनली आहे. वीज प्रत्येकाचा हक्क झाली आहे. देशाला प्रगतीच्या शिखरावर जायचे असल्यास विजेशिवाय पर्याय नाही. वीज उत्पादनासोबत अपारंपरिक ऊर्जा प्रकल्प हे देशात मोठया प्रमाणात उभे राहत असल्याचे प्रधानमंत्र्यांनी सांगितले.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत राज्यातील 42 हजार घरे बांधण्याचा शुभारंभही प्रधानमंत्र्यांच्याहस्ते झाला. स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही अनेकांकडे अजूनही स्वत:चे घर नाही. देशवासियांनी योगदानाचा संकल्प केल्यास येत्या 2022 पर्यंत प्रत्येकाला स्वत:चे घर उपलब्ध होईल. सर्वांनी मिळून गरीबांचे दु:ख दूर करु. गरीबांना घरे देतांनाच रोजगाराच्या संधीही मिळणार आहेत. 21 वे शतक ज्ञानाचे शतक आहे. भारताला विश्वाचे नेतृत्व करण्याचे संधी आहे. नागपूर येथे सुरु करण्यात आलेल्या संस्था युवकांना यासाठी संधी देतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मराठीतून भाषणाची सुरुवात - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली. ‘धम्मचक्र प्रवर्तनाचे कार्य ज्या भूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले त्या भूमीला माझा प्रणाम. काशी प्राचिन ज्ञान नगरी आहे. नागपूर बनू शकते का?’, अशी मराठीतून सुरुवात करताच होय या उत्तरासोबत टाळयांचा प्रचंड कडकडाट झाला. या कार्यक्रमाचे दूरदर्शनवरुन थेट प्रक्षेपण करण्यात आले.
बाबासाहेबांचे आर्थिक विचार कृतीत आणण्याचा प्रयत्न – देवेंद्र फडणवीस -गरीबाच्या कल्याणाचा अजेंडा राबवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आर्थिक विचार कृतीत आणण्याचे प्रयत्न प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे करीत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. सामान्य नागरिकांना सशक्त बनविण्यासाठी योजना राबविल्या जात आहेत. प्रधान मंत्र्यांच्या संकल्पनेतून सुरु झालेले भीम आधार ही योजना संपूर्ण देशात गेम चेंजर ठरेल. आर्थिक समावेशक पारदर्शकता येण्यासाठी या योजनांच्या माध्यमातून राज्यांनीही जबाबदारी पारपाडणे आवश्यक आहेत. त्यादृष्टीने नागपूर जिल्हयात शंभर गावात भीम आधारच्या माध्यमातून व्यवहार सुरु करण्यात आले आहेत. येणाऱ्या एक महिन्यात राज्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये आधार व पीओएस मशीनने जोडल्या जाणार आहेत. यासाठी चांगली व्यवस्था उभी करु. राज्यातील पंधरा हजार ग्रामपंचायती लवकरच डिजीटल होतील. डिसेंबर-2018 पर्यंत प्रत्येक गावात भारतनेटच्या माध्यमातून फायबर यंत्रणा पोहचवू असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
राज्यात 21 शहरात 42 हजार घरांचा शुभारंभ करण्यात आला. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत देण्यात आलेले घरांचे उद्दिष्ट पूर्ण करुन प्रत्येक महिन्यात घरांची संख्या वाढवू. गेल्या कितेक वर्षात बांधण्यात आलेली नाहीत त्यापेक्षा म्हणजे 2 लाख 50 हजार घरांचे बांधकाम राज्यात सुरु आहे. भीम ॲपच्या शुभारंभासाठी प्रधानमंत्र्यांनी नागपूर शहराची निवड केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचे आभार मानले.
No comments:
Post a Comment