'पे ऍण्ड पार्क' बाबत महापालिकेचे सुधारीत धोरण - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 April 2017

'पे ऍण्ड पार्क' बाबत महापालिकेचे सुधारीत धोरण


> ठराविक ठेकेदारांची मक्तेदारी संपुष्टात येणार -
> महिला बचत गट, सुशिक्षित बेरोजगार, संस्था आदी गरजूंना मिळणार प्राधान्य -
मुंबई / प्रतिनिधी - बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात विविध कारणांसाठी मोठ्या प्रमाणात नागरिक आपल्या वाहनाने आवागमन करित असतात. हे करित असताना या वाहनांचे पार्किंग' योग्य ठिकाणी करणे, हा दिवसेंदिवस एक जटील प्रश्न बनत चालला आहे. याच प्रश्नाचा नकारात्मक फायदा घेण्याचा व महापालिकेने ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिक दराने वाहनतळ शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे प्राप्त होत होत्या. मात्र वाहनतळांची क्षमता, वाहनांच्या वर्गवारीनुसार आकारण्यात येणारे शुल्क इत्यादींचा तपशिल वाहनळांवर उपलब्ध नसल्याने या बाबत कारवाई करण्यात स्थानिक पोलीस व वाहतूक पोलीसांना कारवाई करण्यात अडचणी येत होत्या.

वरील सर्व बाबी लक्षात घेऊन बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील सशुल्क वाहनतळांसाठी (Pay and Park) सुधारित धोरण लागू केले आहे. या धोरणाचा मसूदा महापालिकेच्या www.mcgm.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सुधारित धोरणानुसार ठराविक ठेकेदारांची मक्तेदारी संपुष्टात यावी, यादृष्टीने निविदा प्रक्रियेमध्ये काही सुनिश्चित बाबींचा अंतर्भाव करण्यात आला आहे. या अंतर्गत प्रामुख्याने एकूण वाहनतळांच्या ५० टक्के वाहनतळ हे महिला बचत गटांसाठी आरक्षित करण्यात आले आहेत. तर उर्वरितपैकी २५ टक्के हे नोंदणीकृत सुशिक्षित बेरोजगार संस्थांसाठी, तर खुल्या गटासाठी २५ टक्के वाहनतळ असणार आहेत.

रस्त्यावरच्या निर्देशित वाहनतळांवर पिवळे पट्टे आखून सदर जागा वाहनतळासाठी असल्याचे संबंधितांच्या लक्षात यावे. त्याचबरोबर या पिवळ्या पट्ट्याच्या आत वाहन उभे करणेही आवश्यक असणार आहे. सर्व वाहनतळांवर ६ फूट x ५ फूट या आकाराचे दोन फलक लावणे बंधनकारक. या फलकांवर वाहनतळाचे दरपत्रक, वाहनतळाची क्षमता, कंत्राटदाराचे नाव व काही तक्रार करावयाची असल्यास तक्रारीसाठीचा दूरध्वनी क्रमांक इत्यादी तपशील असणे बंधनकारक असणार आहे. सर्व वाहनतळांवर मासिक पासची सुविधा त्या-त्या वाहनतळांसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

ऑटोरिक्क्षा, टॅक्सी, बसेस यासाठी विशेष सवलतीचे दर >>>
बांधकाम विषयक तरतूदींद्वारे महापालिकेला प्राप्त होणा-या 'पब्लिक पार्किंग लॉट' (PPL) आधारित पार्किंग सुविधेचा वापर करण्यास नागरिकांना प्रवृत्त करण्यासाठी याबाबत विशेष सवलतीच्या दरात (५० टक्के) मासिक पास उपलब्ध करुन देण्याची तरतूद सुधारित धोरणामध्ये आहे. परिणामी रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी होऊन वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल. तसेच उपलब्ध असलेल्या 'पब्लिक पार्किंग लॉट' जवळील रस्त्यांवर सुमारे ५०० मीटरच्या परिघामध्ये वाहने पार्किंग करण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत.


पर्यटन स्थळांजवळच्या वाहनतळांवर सुट्टीच्या दिवशी मोफत पार्किंग - बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात जागतिक वारसा स्थळांसह अनेक पर्यटन स्थळांचा समावेश आहे. या पर्यटन स्थळांना दरवर्षी लाखो पर्यटक भेट देत असतात. मुंबईचे जागतिक पर्यटन नकाशावरील असणारे महत्त्वाचे स्थान लक्षात घेऊन महापालिकेचे सुधारित वाहनतळ धोरणामध्ये विविधा पर्यटनपूरक बाबींचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने रविवारी व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी (Bank Holidays) वाहनतळ शुल्कामध्ये ५० टक्के सूट तसेच पर्यटन स्थळांजवळील निश्चित करण्यात आलेल्या वाहनतळांवर सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी मोफत पार्किग आदी सुविधांचा समावेश आहे.

महापालिकेच्या सुधारित वाहनतळ धोरणांमध्ये पर्यटनाला चालना मिळावी तसेच पर्यटकांना अतिरिक्त सुविधा देण्याचा विचार करण्यात आला आहे. यामध्ये सशुल्क सार्वजनिक वाहनतळांच्या जागी रविवारी आणि बँकेच्या सुट्टीच्या दिवशी वाहन उभे करण्याच्या शुल्कात ५० टक्के सूट देण्याचे धोरण ठरविण्यात आले आहेत. तसेच बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील गेट-वे ऑफ इंडिया, जुहू चौपाटी, गिरगाव चौपाटी, छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय इत्यादी पर्यटनस्थळांच्या जवळ असणा-या व निश्चित करण्यात आलेल्या वा करण्यात येणा-या वाहनतळांवर सुट्टीच्या दिवशी मोफत पार्किंग सुविधा उपलब्ध करुन देण्याचे धोरण देखील महापालिकेने स्वीकारले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad