मुंबई ( प्रतिनिधी ) – आंतरराष्ट्रीय स्तराचा अतिशय देखणा असा पेंग्विन कक्ष उभारण्यात मोलाचे योगदान देणा-या अधिका-यांचा प्रातिनिधीक स्वरुपात 'महिन्याचे मानकरी' म्हणून नुकत्याच संपन्न झालेल्या महापालिका अधिका-यांच्या मासिक बैठकीदरम्यान सन्मान करण्यात आला आहे. यानुसार डॉ. संजयकुमार त्रिपाठी, व्ही. डी. साळवे, एन. डी. कुलकर्णी व ऋषीकेश हेंद्रे या चार अधिका-यांचा महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या हस्ते 'महिन्याचे मानकरी' अर्थात 'ऑफिसर्स ऑफ द मंथ' या बहुमानाने गौरव करण्यात आला आहे.
' मुंबई' हे देशाच्याच नव्हे, तर जगाच्या पर्यटन नकाशावरील एक अत्यंत महत्त्वाचे पर्यटन स्थळ आहे. मुंबईतील अनेक महत्त्वाच्या पर्यटन स्थळांमध्ये बृहन्मुंबई महापालिकेच्या 'वीरमाता जिजाबाई भोसले' उद्यान व प्राणिसंग्रहालयाचाही समावेश आहे. 'राणीचा बाग' अशीही ओळख असणा-या या प्राणिसंग्रहालयात दुर्मिळ अशा हंबोल्ट पेंग्वीन पक्ष्यांचा देखील नुकताच समावेश झाला आहे. सध्या या पक्ष्यांना बघण्यासाठी मुंबईकर नागरिक मोठ्या उत्साहाने राणीच्या बागेत येत आहेत.
या कार्यक्रम प्रसंगी अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) आय. ए. कुंदन, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) संजय देशमुख, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. पल्लवी दराडे यांच्यासह महापालिकेचे सर्व संबंधित उपायुक्त, सहाय्यक आयुक्त व विभाग प्रमुख आदी उपस्थित होते. एप्रिल – २०१७ साठीच्या महिन्याच्या मानक-यांमध्ये प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजयकुमार त्रिपाठी, इमारत परिरक्षण खात्यातील कार्यकारी अभियंता व्ही. डी. साळवे, इमारत परिरक्षण खात्यातील यांत्रिकी व विद्युत या उपविभागातील सहाय्यक अभियंता एन. डी. कुलकर्णी आणि प्राणिसंग्रहालयातील सहाय्यक उद्यान अधीक्षक ऋषीकेश हेंद्रे यांचा समावेश आहे.