मुंबई, दि. 1 : विधानसभेत 18 मार्च 2017 रोजी वित्तमंत्री अर्थसंकल्प मांडत असताना गोंधळ घालणाऱ्या सदस्यांना निलंबित करण्यात आले होते. त्यातील अब्दुल सत्तार, संग्राम थोपटे, नरहरी झिरवळ, अमित झनक, वैभव पिचड, दीपक चव्हाण, दत्तात्रय भरणे, अवधूत तटकरे, डी.पी.सावंत या 9 आमदारांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे, अशी माहिती संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. बापट यांनी याबाबतचा ठराव सभागृहात मांडला व तो संमत झाला.
वित्तमंत्री अर्थसंकल्प मांडत असताना विरोधी पक्षातील सदस्यांकडून गोंधळ घालणे, टाळ्या वाजविणे, बॅनर फडकविणे आदी सभागृहाच्या प्रतिष्ठेला अशोभनीय वर्तन केल्यामुळे दि. 22 मार्च, 2017 रोजी 19 आमदारांचे निलंबन 31 डिसेंबर, 2017 पर्यंत करण्यात आले होते. त्यानंतर निलंबित विरोधी सदस्यांनी राज्यपालांना भेटून निलंबन मागे घेण्याची विनंती केली होती. या सदस्यांनी शिस्तभंग केला असला तरी सभागृहाबाहेर अधिक काळ बाहेर ठेवणे उचित नाही म्हणून यापैकी 9 आमदारांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे, अशी माहिती संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी निवेदनाद्वारे दिले.