नाट्यगृह नसलेल्या जिल्ह्यांचा शोध घेऊन माहिती सादर करावी - सुधीर मुनगंटीवार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 April 2017

नाट्यगृह नसलेल्या जिल्ह्यांचा शोध घेऊन माहिती सादर करावी - सुधीर मुनगंटीवार

मुंबई दि. ५ : राज्यातील ज्या जिल्ह्यात अद्यापपर्यंत एकही नाट्यगृह नाही अशा जिल्ह्यांचा तसेच तिथे नाट्यगृहासाठी उपलब्ध असलेल्या जागांचा शोध घेऊन त्यासंबंधीची माहिती सांस्कृतिक कार्य विभागाने सादर करावी, या जिल्ह्यातील नाट्यगृहांच्या बांधकामासाठी एकरकमी निधी विभागास उपलब्ध करून दिला जाईल, असे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
आज वित्तमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली माणगाव जि. रायगड येथील नाटयगृहाबाबतची बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस आमदार सुनील तटकरे, रायगडचे नगराध्यक्ष आनंद यादव, रायगड जिल्हाधिकारी श्रीमती शीतल उगले, नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी समीर जाधव यांच्यासह सार्वजनिक बांधकाम, महसूल विभागाचे तसेच इतर सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

माणगाव नाट्यगृहाची जागा एक महिन्यात निश्चित करून त्यासंबंधीचा विकास आराखडा करावा तसेच एक वर्षभरात नाट्यगृहाचे काम पूर्ण करण्यात यावे, अशा सूचना मुनगंटीवार यांनी दिल्या. माणगावप्रमाणे वर्धा जिल्हयाच्या बंदिस्त नाट्यगृहाची बैठक ही यावेळी झाली. चंद्रपूरच्या धर्तीवर वर्धा जिल्ह्यातील नाट्यगृहाचे बांधकाम बांधकाम विभागाकडून करून घेण्यात यावे, विभागाने यासंबंधीचे अंदाजपत्रक तयार करून त्याचा आराखडा निश्चित करावा, त्यासाठी लागणारा निधी जुलै महिन्यातील अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध करून दिला जाईल असेही मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.

Post Bottom Ad