पुलांच्या पुनर्पृष्ठीकरणाची कामे ३१ मे २०१७ पर्यंत होणार पूर्ण -
मुंबई / प्रतिनिधी - बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी रस्त्यांची विविध कामे; तसेच पुलांच्या पुनर्पृष्ठीकरणाचीही कामे सध्या वेगात सुरु आहेत. या कामांबाबत महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी आज परिमंडळीय उपायुक्तांच्या एका विशेष बैठकी दरम्यान सविस्तर आढावा घेतला.रस्त्यांची कामे जसजशी पूर्ण होतील,तसतसे त्या-त्या ठिकाणचे न वापरलेले बांधकाम साहित्य, राडारोडा (Debris) आणि संरक्षक कठडे (Barricades) हे तातडीने उचलण्याचे व संबंधित रस्ते वाहतुकीसाठी त्वरीत खुले करण्याचे आदेश आजच्या बैठकीदरम्यान देण्यात आले आहेत. तसेच पूल खात्याच्या प्रमुख अभियंत्यांनी दिलेल्या हमीनुसार २८ पुलांबाबत पुनर्पृष्ठीकरणाचे काम १५ मे पर्यंत तर उर्वरित २ पुलांवरील रस्त्याच्या पुनर्पृष्ठीकरणाचे काम ३१ मे पर्यंत पूर्ण करण्याचेही निर्देश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.
आज संपन्न झालेल्या बैठकीला अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) आय. ए. कुंदन, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) संजय देशमुख, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. पल्लवी दराडे, उपायुक्त (आयुक्त कार्यालय) रमेश पवार, प्रमुख अभियंता (रस्ते व वाहतूक) संजय दराडे, प्रमुख अभियंता (पूल) एस.ओ. कोरी यांच्यासह महापालिकेचे सर्व परिमंडळीय उपायुक्त व संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सध्या विविध ठिकाणी रस्त्यांची कामे सुरु आहेत. यामध्ये पूर्णपणे नव्याने बांधण्यात येणा-या ५८३ प्रकल्प रस्त्यांचा (Project Road) समावेश आहे. पुनर्पृष्ठीकरण (Re-Surfacing) संबधीच्या कामांसाठी 'प्राधान्यक्रम -१' अंतर्गत ११० रस्त्यांची कामे तर 'प्राधान्यक्रम - २'अंतर्गत ९३८ रस्त्यांची कामे यापूर्वीच प्रस्तावित करण्यात आली आहेत. 'प्राधान्यक्रम –१' अंतर्गत ११० रस्त्यांच्या पुनर्पृष्ठीकरणाची कामे १५ मे पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश यापूर्वीच देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे 'प्राधान्यक्रम – २'अंतर्गत असणा-या ९३८ रस्त्यांपैकी ४६९ रस्त्यांच्या पुनर्पृष्ठीकरणाची(Surfacing) कामे देखील 'मे २०१७' अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेशही यापूर्वीच देण्यात आले आहेत. त्याबाबतीत देखील आजच्या बैठकीदरम्यान आढावा घेण्यात आला. याचप्रमाणे दोष दायित्व कालावधी अंतर्गत (DLP Road)असणा-या ८२ रस्त्यांची कामे देखील १५ मे पूर्वी पूर्ण करण्याचे आदेश देखील यापूर्वीच देण्यात आले आहेत.या सर्व कामांच्या प्रगतीचाही आढावा आजच्या बैठकीदरम्यान घेण्यात आला आहे.
पुलांवरील रस्त्याच्या पुनर्पृष्ठीकरणाचे काम हे ३१ मे पर्यंत पूर्ण >>>
बैठकीदरम्यान प्रमुख अभियंता (पूल) एस. ओ. कोरी यांनी बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात सध्या सुरु असलेल्या ३० पुलांवरील रस्त्यांच्या पुनर्पृष्ठीकरणाच्या कामांबाबत सविस्तर माहिती दिली.यापैकी २८ पुलांवरील रस्त्यांचे पुनर्पृष्ठीकरणाची कामे १५ मे पर्यंत पूर्ण होतील असे कोरी यांनी सांगीतले. यामध्ये मुंबई सेंट्रल स्टेशनजवळील बेलासिस पूल व डायना पूल, करी रोड पूल, हिंदमाता पूल, चिंचपोकळी पूल, परळ पूल, शीव रुग्णालयाजवळील पूल, गोवंडी पूल, पी दक्षिण विभागातील वीर सावरकर पूल आदी पुलांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त वीरमाता जीजाबाई भोसले उद्यान ते परळ या दरम्यान असणारा २.३८ किमी लांबीचा लालबाग पूल (परळ पूल) आणि सांताक्रूज चेंबूर लिंक रोडवरील 'डबल डेकर' पद्धतीचा २.५५ किमी लांबीचा पूल; या दोन्ही पुलांवरील रस्त्याच्या पुनर्पृष्ठीकरणाचे काम हे ३१ मे पर्यंत पूर्ण होईल, अशीही हमी कोरी यांनी आजच्या बैठकीदरम्यान दिली आहे.
No comments:
Post a Comment