मुंबई ( प्रतिनिधी ) – कुठल्याही एका समुहाकडे सत्ता केंद्रित न राहता त्याचे विकेंद्रिकरण करुन त्याचा लाभ तळागाळातील जनतेपर्यंत पोहचविण्यामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अमूल्य योगदान असल्याचे प्रतिपादन मुंबईचे महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर यांनी केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीचा कार्यक्रम एफ/दक्षिण विभाग कार्यालयात सोमवारी दुपारी आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी अन्न व औषध प्रशासन आयुक्त डॉ.हर्षदिप कांबळे, अप्पर पोलिस महासंचालक धनंजय कमलाकर, प्रा.अॅड.डि.एन.संदानशिव, एफ/ दक्षिण व एफ/उत्तर प्रभाग समिती अध्यक्ष प्रल्हाद ठोंबरे, सार्वजनिक आरोग्य समितीच्या अध्यक्षा रोहिणी कांबळे, महिला व बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा सिंधू मसूरकर, नगरसेवक सर्वश्री. सचिन पडवळ, दत्ता पोंगडे, नगरसेविका उर्मिला पांचाळ, भदन्त लंकानंद थेरो, उप आयुक्त (परिमंडळ -२) आनंद वागराळकर, एफ/दक्षिण विभागाचे सहाय़क आयुक्त विश्वास मोटे, आयोजक नागसेन कांबळे, विजय कांबळे, चंद्रकांत कांबळे, श्रीधर जाधव, संजय मोहिते हे मान्यवर उपस्थित होते .
देशातील वंचीत, दुर्बल घटकांना माणूस म्हणून जगण्यासाठी जे जे काही करता येईल ते सामाजिक समतेच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी करण्याचा प्रयत्न केल्याचे महापौरांनी पष्ट करत जातीभेद संपवून सर्वांना समान अधिकार मिळाला पाहिजे यासाठी मार्गदर्शक तत्वे तयार केली.मूलभूत कर्तव्ये सुध्दा भारतीयांनी पाळावीत यासाठी त्यांचा आग्रह होता.एकंदरित भारतीयांना त्यांनी सांघिक ताकद व उर्जा दिली असून आज जो शांतताप्रिय समाज दिसतो त्याचे श्रेय हे खऱया अर्थाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे जात असल्याचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सांगितले.
अन्न व औषध प्रशासन आयुक्त डॉ.हर्षदिप कांबळे यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबई येथील चैत्यभूमी व नागपूर येथील दिक्षाभूमी पासून मला सदैव प्रेरणा मिळते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका ही संविधान निर्मितीपुरती मर्यादित न राहता सामाजिक संरचनाचा ढाचा त्यांनी जोडला तसेच राष्ट्राच्या निर्मितीमध्ये त्यांचे अमूल्य योगदान असल्याचे सांगत समतेवर आधारित असलेला भारत देश घडविण्यासाठी आपण यापुढेही तत्पर राहू तसेच पालिका शाळेतील विद्यार्थ्यांनी याठिकाणी उत्कृष्ठ गीते सादर केल्याबद्दल अन्न व औषध प्रशासन आयुक्त डॉ.हर्षदिप कांबळे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
तर प्रमुख वक्ते प्रा.अॅड.डि.एन.संदानशिव म्हणाले भारताची अखंडता ही राष्ट्रनिर्माणासाठी खुप महत्वाची बाब असून यासाठी शेवटचा रक्ताचा थेंब सांडण्यास सुध्दा डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यावेळी तयार होते, असे त्यांनी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विद्ववता बघूनच तत्कालीन राजकारण्यांनी त्यांना मसुदा समितीचे अध्यक्ष केल्याचे सांगत त्यांनी मसुदा समितीचा अध्यक्ष म्हणून काम करित असताना त्यावेळी आलेल्या प्रत्येक ठरावावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रदीर्घ भाषणे असून उपस्थित सर्वांनी ती आवर्जून वाचावी असे त्यांनी सांगितले. ज्ञान, तंत्रज्ञानाच्या या युगात माणूस हा केंद्रबिंदू राहणार असून समतावादी समाज निर्माण करायचा असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले
No comments:
Post a Comment