मुंबई ( प्रतिनिधी ) - पालिका सुरक्षा दलातील शौर्यपदक विजेते सैनिक आणि सैनिकांच्या विधवांना मालमत्ता कर माफ करण्याचा प्रस्ताव पालिकेने तयार केला असून लवकरच हा प्रस्ताव पालिका सभागृहात मंजुरीसाठी येणार आहे
मागील अनेक वर्षापासून सैनिकांचा मालमत्ता कर माफ करण्याची मागणी पालिकेत होत होती. त्यासाठी पालिकेच्या कायद्यात तरतूद करण्यासाठी पालिकेने राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवला होता. दरम्यान, सरकारने सैनिकांच्या विधवांच्या नावावर असलेल्या मालमत्तांचा कर रद्द करण्याचा निर्णय घेतल्यामुळे पालिकेनेही हा कर माफ करण्याचा प्रस्ताव विधी समितीपुढे मांडला आहे. लवकरच हा प्रस्ताव पालिका सभागृहात मंजुरीसाठी येणार आहे. मालमत्ता कर माफ करण्यासाठी संबंधितांना दरवर्षी पालिकेकडे अर्ज करावा लागणार असून सरकारमान्य जिल्हा सैनिक बोर्डाचा सदस्य असल्याचा दाखला आवश्यक आहे. दरम्यान अर्जात खोटे पुरावे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पालिकेने स्पष्ट केले आहे. मुंबईत १० हजार ९३५ शौर्यपदक विजेते सैनिक आणि ९,१९६ सैनिकांच्या विधवा पत्नी आहेत. त्यामुळे प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर त्यांना मालमत्ता कर भरावा लागणार नाही.
No comments:
Post a Comment