मुंबई - केंद्र सरकारने व्हीआयपी संस्कृती बंद करण्यासाठी आणि वाहनांवर लाल दिव्याचा गैरवापर रोखता यावा म्हणून देशभरातील अति महत्वाच्या व्यक्तींच्या गाड्यांवरील लाल दिव्यावर 1 मेपासून बंदी घातली आहे. केंद्र सरकारने अशी बंदी घातल्याचा नंतर मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांनी आपल्या वाहनांवरील लाल दिवे काढले मात्र मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी लाल दिवा काढण्यास नकार दिला आहे. राज्य सरकारने अध्यादेश काढल्यानंतरच आपण गाडीवरील लाल दिवा काढू अशी भूमिका महापौरांनी घेतली आहे.
या आधीही मुंबईच्या महापौरांच्या गाडीवर लाल दिव्या ऐवजी अंबर दिवा लावावा असे परिपत्रकात म्हटले होते. त्यावेळी असलेल्या महापौर सुनिल प्रभू यांनी याबाबत सरकारला पत्र लिहून हा महापौरांचा लाल दिवा कायम ठेवावा अशी सूचना केली होती. सरकारचा आदेश येईपर्यंत सुनिल प्रभू यांनी आपली लाल दिव्याची गाडी वापरणे कायम ठेवले होते. प्रभू यांच्या नंतर महापौर झालेल्या स्नेहल आंबेकर यांनीही महापौरांच्या गाडीवर लाल दिवा कायम ठेवावा अशी भूमिका घेतली होती. आता पुन्हा एकदा महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या गाडीवरील लाल दिव्यावर टाच आली आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना महापौरांनी याबाबत आपले सडेतोड मत व्यक्त केले. ते म्हणाले, केंद्रीय कॅबिनेटचा निर्णय सर्वांनीच मान्य करायला हवा, मात्र त्यासाठी राज्य सरकारने तसा अध्यादेश प्रसिद्ध केला पाहिजे. प्रधानमंत्री नरेंद मोदी यांनी भाजपाच्या सर्व मंत्र्यांना खासदारांना आपली संपत्ती जाहीर करण्याचे आवाहन केले होते. मात्र किती मंत्र्यांनी, खासदारांनी संपत्ती जाहीर केली असा प्रश्न करत महाडेश्वर यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.
No comments:
Post a Comment