मुंबई ( प्रतिनिधी ) – केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री जनऔषधी योजनेंतर्गत सुरू करण्यात आलेली जनऔषधी केंद्रे आता मुंबई पालिका आपल्या सर्व रुग्णालयात सुरु करणार आहे, भाजपचे नगरसेवक संदीप पटेल यांनी पालिका सभागृहात मांडलेल्या ठरावाच्या सूचनेला सभागृहाने मंजुरी दिली आहे.त्यामुळे या योजनेमुळे उच्च प्रतीची औषधे, उपकरणे सर्वसामान्य रुग्णास किफायतीशीर किंमतीमध्ये आता लवकरच उपलब्ध होणार आहेत
केंद्र सरकाने प्रधानमंत्री जनऔषधी योजनेंतर्गत प्रधानमंत्री जनऔषधी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या योजनेंतर्गत महाग़डी औषधे उपकरणे आदी जनसामान्यांना किफायतशीर किंमतीमध्ये उपलब्ध केली जातात. या केंद्रांमध्ये मधुमेह, हृदयविकार, रक्तदाब आदी रोगांवरील दुर्मील औषधे व इतर 500 हून अधिक औषधे तसेच मोठ्या शस्त्रक्रियेसाठी लागणारी महत्वाची उपकरणे सवलतीच्या दरात उपलब्ध केली जात आहेत. या सवलतीच्या योजनेमध्ये औषधे व उपकरणांच्या किंमतीमध्ये सुमारे 75 टक्के सूट दिली जात असल्याने त्याचा फायदा गरीब व गरजू रुग्णांना मोठ्या प्रमाणात होऊ शकेल. ही महत्वाची योजना सर्व सामान्य रुग्णांच्या फायद्यासाठी मुंबई महापालिकेच्या सर्व रुग्णालयात सुरू करावीत अशी ठरावाची सूचना पटेल यांनी सभागृहात मांडून लक्ष वेधले. या सूचनेला सभागृहाने मंजुरी दिल्याने आता पालिकेच्या रुग्णालयात दाखल होणा-या रुग्णांना प्रधानमंत्री जन औषधी योजनेचा मोठा दिलासा मिऴणार आहे.
No comments:
Post a Comment