अग्निशमन दलातील जवानांच्या प्रशिक्षणासाठी पालघर जिल्ह्यात अग्निशमन प्रबोधिनी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 April 2017

अग्निशमन दलातील जवानांच्या प्रशिक्षणासाठी पालघर जिल्ह्यात अग्निशमन प्रबोधिनी


मुंबई, दि. 20 : अग्निशमन दलातील शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या पाठीशी राज्य शासन भक्कमपणे उभे राहील. अग्निशमन दलातील जवानांच्या अत्याधुनिक प्रशिक्षणासाठी अग्निशमन प्रबोधिनी उभारण्यात येणार आहे. त्यासाठी पालघर जिल्ह्यातील विराथन खुर्द येथे साडेबारा एकर जमीन दिली असून पन्नास कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी आज येथे दिली. 

अग्निशमन सेवा सप्ताहाचा समारोप आणि अग्निशमन सेवा पदक प्रदान समारंभ डॉ. रणजीत पाटील यांच्या हस्ते गेट- वे ऑफ इंडिया येथे पार पडला. याप्रसंगी ते बोलत होते. नगरविकास विभागाच्या सचिव मनिषा म्हैसकर, केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयाच्या अग्निशमन सेवा,नागरी संरक्षण, गृहरक्षक दलाचे महासंचालक प्रकाश मिश्रा, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आय. एस. कुंदन, केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयांतर्गत अग्निशमन सल्लागार डी. के. शमी,महाराष्ट्र अग्निशमन सेवा दलाचे संचालक आणि मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख अग्निशमन अधिकारी प्रभात रहांगदळे, चित्रपट अभिनेते आणि देशातील अग्निशमन सेवेचे सदिच्छा दूत रणदीप हुड्डा या प्रसंगी उपस्थित होते.

अग्निशमन दलाचे जवान विविध आपत्तींमध्ये जीवाची बाजी लावून नागरिकांच्या जीवनाचे रक्षण करत असतात, असे गौरवोद्गार काढून डॉ. पाटील पुढे म्हणाले की, काही वेळा नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागत असले तरी काही काळजी घेतल्यास आग व अन्य कृत्रिम आपत्तींची तीव्रता कमी करता येऊ शकते. दुर्घटनेच्या ठिकाणी हे जवान अत्यंत जलदगतीने पोहोचतात व कमीत कमी हानी होईल याची दक्षता घेतात, असेही डॉ. पाटील म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, अग्निशमन दलातर्फे इतर दलातील जवानांना फ्लड ॲण्ड रेस्क्यू प्रशिक्षणासाठी पालघर जिल्ह्यातीलच खर्डी येथे पाच एकर जमीन दिली असून तेथे पूरग्रस्तांची सुटका करण्याबाबतचे प्रशिक्षण दिले जाणार जाणार आहे. महापालिका,नगरपालिका, नगरपंचायती या नागरी स्थानिक संस्थांना अग्नीशमन दलाची अत्याधुनिक मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी शासन कटीबद्ध आहे.

नगरविकास विभागाच्या सचिव मनिषा म्हैसकर म्हणाल्या की,मुंबई अग्निशमन दलाचे जवान अत्यंत कार्यक्षम असल्याचा अनुभव महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून काम करताना घेतला आहे. अग्निशनम दलाला प्रगत करण्यासाठी ‘स्टेट ऑफ दी आर्ट’ यंत्रणा उपलब्ध करुन दिली जाईल. दलाने सुरु केलेला अग्निसुरक्षा सप्ताह अत्यंत स्तुत्य उपक्रम असून दुर्घटना टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे प्रबोधन नागरिकांमध्ये केल्यास दुर्घटनांचे प्रमाण निश्चितच कमी करता येईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

यावेळी मिश्रा म्हणाले की, मुंबई अग्निशमन दल एक अत्याधुनिक आणि जलद प्रतिसाद देणारे दल असून मुंबई अग्निशमन सेवेचे आधुनिकीकरण करण्यासाठी भारत सरकारकडून आवश्यक ती सर्व मदत करण्यात येईल.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad