मुंबई, दि. 13 : लोकशाही प्रक्रियेपासून वंचित राहिलेला समाज, आदिवासी, युवक, महिला, सैन्यदलातील कर्मचारी, तृतीयपंथी, वेश्याव्यवसायातील व्यक्ती, स्थलांतरीत कामगार इत्यादी घटकांचा लोकशाही प्रक्रियेमध्ये समावेश करुन या मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी भारत निवडणूक आयोगामार्फत स्वीप (SVEEP) कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्याअंतर्गत 15 एप्रिल, 2017 रोजी ‘तृतीय पंथी दिन’ साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जनसामान्यांना लोकशाही प्रक्रियेमध्ये सामावून त्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भारत निवडणूक आयोगामार्फत वेळोवेळी जनजागृती करण्यात येत असते. म्हणून 15 एप्रिल, 2017 रोजी ‘तृतीय पंथी दिन’ साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तृतीयपंथीयांच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या अशासकीय संस्थांच्या मदतीने तृतीयपंथीयांमध्ये जनजागृती करण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये ध्वनीचित्र फीत व लोकल ट्रेनवर जाहिराती लावून 14 ते 20 एप्रिलदरम्यान या माध्यमातून प्रचार व प्रसिद्धी करण्यात येणार आहे.
15 एप्रिल, 2014 रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाद्वारे मतदार यादीमध्ये स्त्री/पुरुष या वर्गवारीबरोबर तृतीयपंथी अशी स्वतंत्र वर्गवारी नमूद करण्यात आली असल्याने, तृतीय पंथीयांची स्वतंत्र नागरिक म्हणून ओळख निर्माण करुन दिली आहे. या दिनानिमित्त तृतीयपंथीयांमध्ये लोकशाही प्रक्रियेबद्दल जागृती निर्माण व्हावी व त्यांच्या अधिकाराची त्यांना जाणीव व्हावी या उद्देशाने मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने बृहन्मुंबई क्षेत्रामध्ये हा विशेष कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment