कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी प्रदेश काँग्रेसची स्वाक्षरी मोहिम - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 April 2017

कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी प्रदेश काँग्रेसची स्वाक्षरी मोहिम

मुंबई दिनांक 11 एप्रिल 2017 - पाकिस्तानच्या कैदेत असलेले महाराष्ट्राचे सुपुत्र कुलभुषण जाधव यांच्या सुटकेसाठी सरकारने तात्काळ प्रयत्न करावेत म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी तर्फे राज्यभर सह्यांची मोहिम राबवली जाणार आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या आदेशावरून राज्यभरात ही मोहिम राबवली जाणार असून सह्यांचे निवेदन जिल्हाधिका-यांना देऊन राज्यातील लोकांच्या भावना सरकारपर्यंत पोहोचविल्या जाणार आहेत.

कुलभुषण जाधव यांच्यावर ते भारतीय गुत्तहेर संस्थेचे हेर असून हेरगिरी करण्यासाठी पाकिस्तानात घुसले अशा खोटया आरोपाखाली पाकिस्तान सरकारने अटक करून त्यांच्यावर पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयात खटला भरला. जाधव यांना आपल्या बचावाची कुठलीही संधी न देता आंतररष्ट्रीय कायदा पायदळी तुडवून पाकिस्तानी लष्करी न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी पाकिस्तानचा निषेध करून पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाचा हा निकाल मानवी हक्क आणि न्यायाच्या विरोधात आहे म्हटले आहे. पाकिस्तानचे सुरक्षा सल्लागार सरताज अजीज यांनीही कुलभुषण जाधव हे रॉ या भारतीय गुप्तहेर संस्थेसाठी हेरगिरी करत असल्याचे पुरावे नसल्याचे पाकिस्तानी संसदेत सांगितले आहे. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार जाधव यांना कायदेशीर मदत देण्यासाठी भारतीय वकालतीतील अधिका-यांनी 13 वेळा पाकिस्तान सरकारकडे परवानगी मागितली मात्र ती त्यांना देण्यात आली नाही तसेच जाधव यांना आपली बाजू मांडण्यासाठी वकील देण्याची परवानगी ही दिली नाही. यावरून पाकिस्तानचा पूर्वग्रहदूषित भारत विरोधी दृष्टीकोन सिध्द होत आहे.

पाकिस्तानी न्यायालयाने जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर आता अचानक भारत सरकार जागे झाले असून भारताच्या तुरुंगातील पाकिस्तानी कैद्यांना आम्ही सोडणार नाही अशी धमकी देत आहे. तथापी एवढ्याने जाधव यांची सुटका पाकिस्तान करेल अशी शक्यता नाही. आमची भारत सरकारकडे मागणी आहे की, महाराष्ट्राच्या सुपुत्राला वाचवण्यासाठी सरकारने अधिक आक्रमक होऊन नेमके व अधिक सक्रिय धोरण स्वीकारावे व आंतरराष्ट्रीय दबाव आणून जाधव यांना भारतात परत आणण्यासाठी तातडीने पावले उचलावीत. तसेच महाराष्ट्र सरकारने जाधव यांच्या सुटकेसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा. याबाबतीत जनमानसाची व काँग्रेस पक्षाची भावना सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी ही सह्यांची मोहीम राबवली जाणार असून सह्यांचे निवेदन जिल्हाधिका-यांना देण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad