शेतीसाठी मिळणार दिवसा बारा तास अखंड वीज - मुख्यमंत्री - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 April 2017

शेतीसाठी मिळणार दिवसा बारा तास अखंड वीज - मुख्यमंत्री


मुंबई, दि. 16:- शेतीसाठी दिवसा बारा तास अखंड वीज पुरवठा देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ या कार्यक्रमात शेतकऱ्यांशी संवाद साधतांना केली. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित या कार्यक्रमाचा दुसरा भाग दुरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरुन आज प्रसारीत झाला.

कार्यक्रमाच्या पहिल्या भागात गेल्या रविवारी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यात अनुदाने थेट जमा करण्याबाबत शासनाचा निर्णय जाहीर केला होता आणि कर्ज माफीच्या विषयावर सविस्तरपणे शासनाची भुमिका मांडली होती.

सौर ऊर्जा व पडीक शेतजमीनीसंदर्भात उमाकांत जोशी व स्वामी विशे यांनी विचारलेल्या प्रश्नांना थेट उत्तरे देतांना मुख्यमंत्री म्हणाले, सौर ऊर्जा प्रकल्पासाठी केंद्र सरकार निधी देत असून राज्यात सौर ऊर्जेचे प्रकल्प उभारण्याचे काम सुरु आहे. यातूनच शेतकऱ्यांसाठी दिवसा 12 तास अखंड वीज उपलब्ध होणार आहे. सौर ऊर्जा क्षेत्रातील गुंतवणूक दिर्घकाळासाठी उपयुक्त ठरणार आहे.

यशवंत पोपळे व मधुकर पवार या शेतकऱ्यांनी सूक्ष्म सिंचनाबाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, सूक्ष्म सिंचनामुळे पाण्याची बचत होते, उत्पादकता वाढते, सूक्ष्म सिंचनामुळे पिकांचे योग्य प्रकारे नियोजन करता येते. सरकार साखर कारखाने व शेतकऱ्यांच्या मदतीने राज्यातील पाच धरणक्षेत्रातील संपूर्ण ऊस शेती ठिबक सिंचनावर आणणार. तसेच अपूर्ण सिंचन प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून 26 हजार कोटी रुपये मिळणार आहेत. यामुळे अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यास मोठी मदत होणार आहे. जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली कोकणातील पाच नद्यांचे पुनरूज्जीवन करून कोकणातील फळ प्रक्रिया उद्योगाला चालना देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

सातारा येथील राजेंद्र गायकवाड यांनी हळद पीक संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, जगात हळदीचे महत्व वाढत असून यासाठी जागतिक बाजारपेठ उपलब्ध होत आहे. हळद प्रक्रिया उद्योग निर्माण करण्यासाठी 50 लाख रुपयांपर्यंतची योजना आहे. सातारासह राज्यातील अन्य जिल्ह्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांना ही योजना फलदायी ठरणार आहे.

एसएमएसद्वारे नाशिकच्या सदाशिव पांगरे यांनी हवामान बदलाचा कृषी क्षेत्रावर होत असलेल्या परिणामाचा कसा मुकाबला करणार या बाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, शासनाने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पाचा मूळ उद्देश वातावरणातील बदलाचा मुकाबला करणारी शेती तयार करणे असा आहे. नाशिकच्या द्राक्ष उत्पादक शेतक-यांना लागणा-या आच्छादनाची निर्मीतीही राज्यात करण्यासाठी शासन प्रयत्नशिल आहे. यामुळे आच्छादनाच्या किंमतीही कमी होतील.

कृषी आणि ग्रामविकासावर लक्ष केंद्रित करणे ही काळाची गरज बनली आहे. म्हणूनच राज्याचा विकास करताना कृषी आणि ग्रामविकासाला प्राधान्य देणार असल्याचीही ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad