गुणवत्तापूर्ण जीवन व उत्कृष्ट राहणीमानासाठी स्वच्छ शहरांची निर्मिती करुया - मुख्यमंत्री - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 April 2017

गुणवत्तापूर्ण जीवन व उत्कृष्ट राहणीमानासाठी स्वच्छ शहरांची निर्मिती करुया - मुख्यमंत्री


मुंबई, दि. 13 : राज्याचा विकास दर हा शहरांच्या विकासावर अवलंबून असल्याने तो अधिकाधिक वाढण्यासाठी नागरीकांना चांगले राहणीमान व गुणवत्तापूर्ण जीवन देण्यासाठी स्वच्छ शहरांची निर्मिती होणे आवश्यक आहे. यासाठी सर्वांनी एकत्रित मिळून प्रयत्न करुया, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.

अमृत व नगरोत्थान अभियानातंर्गत राज्यातील 28 शहरांमध्ये 1 हजार 622 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचा ई-भूमिपुजन समारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज वर्षा निवासस्थानी संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते. या सोहळ्यास केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार सुनील तटकरे, विनायकराव जाधव पाटील, मुख्य सचिव सुमित मल्लिक, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव मिलींद म्हैसकर, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, नगरपरिषद संचालनालयाचे आयुक्त विरेंद्र सिंग यांचेसह नगरविकास व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, उंच इमारती, सुंदर रस्ते व बगीचे तयार केले म्हणजे शहरांचा विकास झाला असे मानणे पूर्णत: योग्य ठरत नाही तर शहरांमधील नागरिकांना शाश्वत पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देणे, मलनि:स्सारणाच्या सोयीसुविधा उपलब्ध करणे, सांडपाण्याचा पुनर्वापर करुन शहरांमध्ये हरितपट्टे तयार केल्यास शहरांचा विकास होईल. शहरांच्या विकासावरच राज्याचा विकास दर अवलंबून असल्याने शहरांच्या विकासासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत मोठया प्रमाणात निधी उपलब्ध करुन दिला आहे. या निधीच्या माध्यमातून राज्यात मोठया प्रमाणात विकासाची कामे होत आहेत. मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, वाढते नागरीकरण ही समस्या न मानता संधी मानून शहरांचा विकासास प्राधान्य देणे आवश्यक आहे. यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी राज्याला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन दिला आहे. या निधीचा पुरेपूर वापर करुन शहरांचा विकास साधण्यात येत आहे. या विकासाच्या माध्यमातून शहरांमध्ये रोजगार निर्माण होण्यास मदत होणार आहे.

स्वच्छ, सुंदर व स्मार्ट शहरांच्या निर्मितीसाठी शहरांचा विकास आराखडा महत्वाचा असतो. यासाठी विकास आराखड्याला महत्व देण्यात आले आहे. शहरांचा नियोजनबध्द विकास होण्यासाठी यापुढे शहरांतील बांधकामांचे नकाशे डिजिटल पध्दतीने मंजूर करण्यात येणार असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, शहरांमधील कामे गुणवत्तापूर्ण व वेळेत पूर्ण होण्यासाठी नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. कामांची गुणवत्ता न राखल्यास संबंधितांवर कारवाई करण्यास शासन मागेपुढे पाहणार नाही. त्याचबरोबर उत्तम शहरे निर्माण व्हावीत यासाठी निवड स्पर्धा सुरु करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून शहरांच्या विकासाला चालना देण्याबरोबरच गुणवत्तापूर्ण कामे होण्यास मदत होणार आहे.

नागरिकांना त्यांच्या कामासाठी कार्यालयात जाण्याची गरज भासू नये यासाठी नागरी भागातील सर्व सेवा ऑनलाईन देण्यासाठी ई- पोर्टल तयार करण्यात येत आहे. या पोर्टलच्या माध्यमातून नागरिकांना त्यांना आवश्यक असलेल्या सेवा ऑनलाईन उपलब्ध होणार आहे. तसेच नगरपालिकांनी नागरिकांना मुलभूत सुविधा देण्यासाठी विकास आराखडा तयार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

ते पुढे म्हणाले की, केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबविण्यात येत असून या अभियानाच्या माध्यमातून राज्यातील 100 शहरे संपूर्ण हागणदारीमुक्त झाली आहे. येत्या ऑक्टोबर 2017 पर्यंत राज्यातील संपूर्ण शहरे हागणदारीमुक्त करण्यात येणार आहे. देशातील स्वच्छ शहरांमध्ये सर्वाधिक स्वच्छ शहरे महाराष्ट्रातील आहेत. त्याचबरोबर, सर्वाधिक 7 स्मार्ट शहरे असणारे देशातील महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. तर अमृत अभियानात राज्यातील 44 शहरांचा समावेश करण्यात आला आहे. या विविध योजनांच्या माध्यमातून राज्यातील नागरी भागात मोठ्या प्रमाणात विकासाची कामे सुरु आहेत. या विकास कार्यात सर्वांनी सहभाग द्यावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी उपस्थितांशी वेब कास्टद्वारे संवाद साधताना केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS