मुंबई - मुंबई महापालिका प्रशासनाने यांत्रिक झाडू आणि एरिया बेस व्यवस्था ताबडतोब बंद न केल्यास पालिकेतील घनकचरा व्यवस्थापन खात्यातील कामगार येत्या १८ एप्रिलपासून संप पुकारतील, असा इशारा म्युनिसिपल मजदूर युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी दिला आहे. नव्यानेच सुरू केलेली यांत्रिक झाडू सफाई आणि एरिया बेस साफसफाई पद्धतीला विरोध दर्शवण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन खात्यातील कामगारांनी गुरुवारी पालिका मुख्यालयावर मोर्चा नेला तसेच आझाद मैदानावर धरणे आंदोलन केले.
मुंबई पालिका प्रशासनाने १ मार्चपासून पूर्व उपनगरांतील देवनार, घाटकोपर, भांडुप, मुलुंड अणि १ एप्रिलपासून वांद्रे, अंधेरी, गोरेगाव, मालाड येथे कंत्राटदारांमार्फत यांत्रिक झाडूने रस्त्याची सफाई सुरू केल्यामुळे काही कामगारांचे 'बीट' बदलले असून कंत्राटी कामगारांना कामावरून बंद केले आहे. ही यांत्रिक झाडू मोठय़ा रस्त्यांची आणि गल्लीबोळांच्या सफाईसाठी वापरण्यात येत आहे. रस्ता झाडणे, कचरा गोळा करणे, संबंधित विभागातून जमा झालेला कचरा क्षेपणभूमीवर टाकण्यासाठी वाहून नेणे ही या कामांसाठी 'एरिया बेस' पद्धत सुरू केली आहे. या पद्धतीमध्ये प्रत्येक विभागातील ५0 टक्के काम कंत्राटदारांकडून करून घेतले जाणार आहे. रस्त्यांच्या सफाईसाठी पालिका दरमहा ४0 हजार रुपये खर्च करते, पण यांत्रिक झाडूने साफसफाई करण्यासाठी एक किलोमीटर रस्त्याला दररोज २७00 रुपये म्हणजे महिन्याला ८१ हजार रुपये एवढा खर्च येणार आहे. या नव्या पद्धतीमुळे कायमस्वरूपी आणि हंगामी असे तब्बल ४0 हजार बेकार होणार आहेत, असा आरोप राव यांनी केला. यांत्रिक झाडूचा वापर सुरू केल्यानंतर हंगामी कामगारांना कामावर ठेवून, कायमस्वरूपी कामगारांना कमी करण्याचा पालिका प्रशासनाचा डाव आहे. यापेक्षा कायमस्वरूपी कामगारांना महापालिकेच्या अन्य विभागात सामावून घेण्याची मागणी संघटनेचे अध्यक्ष अँड़ सुखदेव काशिद यांनी केली आहे. कंत्राटदाराकडून यांत्रिक झाडूचा वापर आणि एरिया बेस पद्धतीमुळे पालिकेचा फायदा होण्याऐवजी प्रचंड आर्थिक नुकसान होणार आहे, याकडेही काशिद त्यांनी लक्ष वेधले.