मुंबई (प्रतिनिधी)- मुंबईतील रस्त्यांच्या कामांचा दिडशे कोटींचा प्रस्ताव आयत्यावेळी आल्याने प्रशासनाचा गोंधळ उडाला. हीच संधी साधत नगरसेवकांनी रेंगाळलेल्या रस्त्यांच्या कामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करुन गोंधळ घातला. प्रशासनाने यावर माघार घेण्याची तयारी दर्शवताच नगरसेवकांनी हा प्रस्ताव एकमताने मंजूरी देण्याचे मान्य केले. अखेर स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगांवकर यांनी प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यामुळे आयत्या वेळी आलेल्या प्रस्तावाचे नेमके गौडबंगाल काय, याची चर्चा सभागृहात रंगली होती.
पूर्व उपनगरांतील घाटकोपर येथील गरोडीया नगर व कुर्ला येथील एलबीएस मार्गावरील सुमारे दीडशे कोटी रुपयाच्या रस्त्यांच्या कामांचे प्रस्ताव बुधवारी स्थायी समितीत मंजुरीसाठी आणला होता. घाटकोपर येथील एलबीएस मार्गावरील तब्बल १३६ कोटीच्या कामांचा रस्त्याचाच प्रस्ताव स्थायी समितीत चर्चेसाठी आल्यावर प्रशासनाचा गोंधळ उडाला. हा प्रस्ताव आताच मिळाला, त्यामुळे त्यावर उत्तरे देण्याची तयारी नसल्याने हा प्रस्ताव पुढील सभेत चर्चेला आणल्यास उत्तरे देता येईल, असे स्थायी समितीत उपस्थित असलेले अतिरिक्त आयुक्तांनी स्पष्ट केले. त्यावर नगरसेवक उग्ररुप धारण करुन प्रशासनाच्या कारभारावर टीका केली.
प्रशासन समितीचे अधिकारांवर गदा आणत असल्याच आरोप सपाच्या रईस शेख यांनी केला. तर प्रथमच आयुक्तांना प्रस्ताव न मिळण्याचा प्रकार घडल्याचे प्रभाकर शिंदे यांनी स्पष्ट केले. समितीला गृहीत धरु नका असा इशारा देत सर्वपक्षीय नगरसेवकांना सदर प्रस्ताव आदल्यादिवशी मिळतो तर मग प्रशासनाला का मिळत नाही? असा प्रश्न उपस्थित केला. दरम्यान, १३६ कोटीचा प्रस्ताव माझ्याकडे उशिरा आल्याने त्यावर नीट उत्तर देता आले पाहिजे म्हणून पुढील सभेत आणा असे म्हटल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.
No comments:
Post a Comment