मुंबई (प्रतिनिधी) - भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान (राणीबाग) व प्राणीसंग्रहालयाची स्वच्छता केली जाणार आहे. पालिकेने याकरिता कंत्राटदारांचा शोध सुरु केला असून निविदा प्रक्रियेला सुरुवात केली आहे. प्रशासनाने तसा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवला आहे.
वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालयाच्या नुतनीकरणाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. येथे पेंग्विन कक्ष सुरू झाल्यापासून येथे येणाऱ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. रोज सुमारे ११ हजार ते १५ हजार लोक प्राणीसंग्रहालयाला भेट देत असल्याची नोंद आहे. शनिवार, रविवार या सुट्टीच्या दिवशी हा आकडा तीन हजारच्या जवळपास जातो, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. रोजच्या वाढत्या गर्दीमुळे येथील परिसरात अस्वच्छतेच्या प्रमाणात वाढते. त्यामुळे हा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी पुरेसा प्रमाणात मनुष्यबळ नसते. परिसराची साफसफाई व्यवस्थितरित्या होत नसल्याने येथील अस्वच्छेतेबाबत तक्रारी येतात. त्यामुळे परिसराची स्वच्छता राखण्यासाठी पालिकेने कंत्राटदाराची निवड करण्याचा निर्णय घेतला आहे.
प्राणी संग्रहालय व उद्यानाचे काम पूर्ण होण्यासाठी अंदाजे दीड वर्षाचा कालावधी लागेल. पर्यटकांच्या वाढत्या गर्दीमुळे येथे स्वच्छता राखण्याचे काम करावे लागणार आहे. सध्या निविदा प्रक्रिया सुरु आहे. मात्र, तोपर्यंत प्रायोगित तत्वावर मे. सिगमा टेक इन्फ्रा सोल्यूशन प्रा. लि. या कंत्राटदाराची प्रायोगित तत्वावर निवड करण्यात आल्याचेप्रशासनाने स्पष्ट केले.
No comments:
Post a Comment