अन्यायग्रस्त अधिकाऱ्यांचे बंड - पोस्टिंग घेण्यास नकार -
महापालिका प्रशासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह -मुंबई / अजेयकुमार जाधव -
मुंबई महापालिकेच्या लायसंस विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या अतिक्रमण निर्मूलन विभागात बदल्यांचे नियम धाब्यावर बसवून अधिकाऱ्यांना हव्या असलेल्या विभागात बदल्या केल्या जात असल्याने इतर अन्याय होणाऱ्या अधिकाऱ्यांनी या विरोधात बंड पुकारले आहे. एखाद्या अधिकाऱ्याला मनासारखी पोस्टिंग मिळत असेल तर इतर अधिकाऱ्यावर अन्याय का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. एखाद्या अधिकाऱ्याला मनासारखी पोस्टिंग देण्यापेक्षा इतर अधिकाऱ्यांनाही मनासारखी पोस्टिंग मिळावी अन्यथा मार्च महिन्यात काढलेली लॉटरी रद्द करून पुन्हा नव्याने लॉटरी काढण्याची मागणी केली जात आहे.
मुंबई महापालिकेत लायसन्स विभागाच्या व त्या विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या अतिक्रमण निर्मूलन विभागातील अधिकाऱ्याना रोजचा मलिदा मिळत असतो. हा मलिदा काही विभागात कमी तर काही विभागात जास्त मिळत असतो. यामुळे ज्या विभागात जास्त मलिदा मिळतो त्या विभागात अधिकारी होण्याची अनेक अधिकाऱ्यांची इच्छा असते. महापालिकेत कोणत्याही अधिकाऱ्यांना कोणत्या पदावर बदली करायची, त्या अधिकाऱ्यांची किती वर्षाने बदली करायची हे लॉटरी काढून ठरवले जाते. ज्या अधिकाऱ्यांनी पोस्टिंग साठी खाल पासून वर पर्यंत सेटिंग लावली आहे अश्या अधिकाऱ्यांची नावे लॉटरीमध्ये समावेश न करता नेमणुका केल्या जात आहेत.
अतिक्रमण निर्मूलन विभागामार्फत वरिष्ठ निरीक्षक पदाच्या पोस्टिंगसाठी २६ डिसेंबर २०१६ ला लॉटरी काढण्यात आली. यात "ए" विभागाचे अधिकारी म्हणून नवनीत मोरे यांची नियुक्ती करण्यात आली. दरम्यान मोरे यांना घाटकोपरच्या "एन" विभागाचाही अतिरिक्त भार देण्यात आला. एन विभागातील फेरीवाल्याना त्रास देत असल्याने मोरे यांची माजी महापौर स्नेहल आंबेकर यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीला वरून महापौरांनी जानेवारी २०१७ ला पूर्व उपनगरच्या अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे यांना मोरे यांच्यावर कारवाई करण्याचे पत्र दिले होते. महापौरांच्या निर्देशानंतर मोरे यांच्याकडून जानेवारी 2017 ला एन विभागाचा चार्ज काढून घेण्यात आला. ए विभागातही मोरे यांनी काही अफरातफर केल्याने ए विभागातूनही मोरे यांना निलंबित करण्यात आल्याचे समजते.
नुकतीच मार्च २०१७ ला अतिक्रमण निर्मूलन विभागातील वरिष्ठ निरीक्षक पदाच्या 14 अधिकाऱ्यांच्या पोस्टिंगसाठी लॉटरी काढण्यात आली. या लॉटरीमध्ये एन विभागाचे पद रिक्त असताना एन विभागाचा समावेश करण्यात आलेला नाही. एन विभागात जागा रिक्त असताना या विभागाचा लॉटरीमध्ये समावेश न करता एन विभागातील रिक्त पदावर नवनीत मोरे यांची नियुक्ती करण्यात आली. मोरे यांची डिसेंबर २०१६ मध्ये ए विभागात पोस्टिंग झाली असताना त्यांना पुन्हा ४ महिन्यात एन विभागाचा चार्ज देण्यात आला आहे. मोरे यांच्यावर महापौरांच्या आदेशाने याच विभागातून कारवाई केली असताना आंबेकर यांचे महापौर पद जाताच पुन्हा एन विभागात कायदे धाब्यावर बसवून नेमणूक करण्यात आली आहे. मोरे यांना एन विभागातील पदावर नेमणूक करण्यासाठी वरपर्यंत मोठी सेटिंग लावली गेल्याची माहिती उपलब्ध झाली असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. याबाबत पालिकेच्या लायसन्स विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकलेला नाही.
अधिकाऱ्यांचे बंड
नवनीत मोरे यांना हव्या असलेल्या घाटकोपर येथील एन विभागात लॉटरी मध्ये समावेश न करता चार्ज देण्यात आला आहे. यामुळे अतिक्रमण विभागातील इतर अधिकारी नाराज झाले आहेत. याविरोधात इतर अधिकाऱ्यानी बंड पुकारले असून मार्च महिन्यात लॉटरीमधून मिळालेल्या पोस्टिंगचा चार्ज स्वीकारण्यास या अधिकाऱ्यानी नकार दिल्याचे समजते. मोरे यांना जर मनासारखी आणि हवे त्या विभागात पोस्टिंग मिळत असेल तर इतर अधिकाऱ्यांना लॉटरी काढून पोस्टिंग का दिली जाते असा प्रश्न अधिकाऱ्याकडून विचारला जात आहे.
याआधीही नियमबाह्य नेमणूका
एन विभागात लॉटरी न काढता पोस्टिंग मिळालेले नवनीत मोरे हे एकटे अधिकारी नाहीत. मोरे यांच्या आधीही एक वर्षांपूर्वी लॉटरी न काढता आर उत्तर विभागातील अडसू यांना एफ दक्षिण विभागात तर दोन वर्षांपूर्वी एफ दक्षिण विभागातील विलास पवार यांना ई विभागात पोस्टिंग देण्यात आली आहे.