मुंबई (प्रतिनिधी)- पालिका रुग्णालयांमध्ये दर्जेदार वैद्यकीय सुविधा पुरविण्यासाठी १६ उपनगरीय रुग्णालयांमध्ये ८१२ डॉक्टरांची तर ५८२ परिचारकांची पदे लवकरच भरण्यात येणार आहेत. यात २७४ पदव्युत्तर वैद्यकीय अधिकारी, १०३ निवासी अधिकारी, ७८ प्रबंधक, २८७ वरिष्ठ प्रबंधक आणि ७० सहाय्यक वैद्यकीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे. वैद्यकीय सेवांच्या बळकटीकरणासाठी पालिकेने यंदाच्या अर्थसंकल्पात तशी तरतूद केली आहे.
गोरगरीब जनतेला व सर्वसामान्यांना अधिक व्यापक स्तरावर वैद्यकीय सेवा - सुविधा देता याव्यात यादृष्टीने महापालिकेची १६ उपनगरीय रुग्णालये कार्यरत आहेत. यापैकी ८ रुग्णालये ही पूर्व उपनगरांमध्ये, तर उर्वरित ८ रुग्णालये ही पश्चिम उपनगरांमध्ये आहेत. सध्या या सर्व रुग्णालयांमध्ये एकूण ३ हजार ५०४ खाटांची व्यवस्था आहे. या रुग्णालयांमधील सध्याची रिक्त पदे, खाटांची संख्या इत्यादी बाबी लक्षात घेऊन या सर्व रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची एकूण ८१२ पदे भरण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. पश्चिम उपनगरांमधील वांद्रे पश्चिम परिसरातील ४३६ खाटांच्या खुरशादजी बेहरामजी भाभा रुग्णालयामध्ये डॉक्टरांची ७६ पदे, सांताक्रूज पूर्व परिसरातील २५९ खाटांच्या विष्णूप्रसाद नंदराय देसाई महापालिका रुग्णालयात ६८ पदे भरण्यात येणार आहेत. गारेगांव पश्चिम परिसरातील १७२ खाटांच्या सिद्धार्थ रुग्णालयात डॉक्टरांची ४७ पदे, मालाड पूर्व परिसरातील ५० खाटांच्या स. का. पाटील रुग्णालयात १५ पदे भरण्याचे प्रस्तावित आहे. तसेच मालाड, कांदिवली, बोरीवली, पूर्व उपनगरांत चेंबूर येथे मॅा रुग्णालयात, गोवंडी येथील शताब्दी रुग्णालय, घाटकोपर येथील राजावाडी, संत मुक्ताबाई तसेच मुलुंड पर्यंतच्या रुग्णालयात विविध पदे भरली जाणार आहेत, अशी माहिती महापालिकेच्या उपनगरीय रुग्णालयांचे खातेप्रमुख व प्रमुख वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रदीप जाधव यांनी दिली.
No comments:
Post a Comment