अत्याधुनिक शस्त्रक्रियांकरिता मॉड्युलर ऑपरेशन थिएटर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 April 2017

अत्याधुनिक शस्त्रक्रियांकरिता मॉड्युलर ऑपरेशन थिएटर

केईएममध्ये पाच तर नायर व सायनमध्ये 2 कक्ष उभारणार -
अर्थसंकल्पात २१ कोटीची तरतूद -
मुंबई (प्रतिनिधी)- पालिका रुग्णालयात करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रिया यापुढे अत्याधुनिक पध्दतीने करता येणार आहेत. पालिकेने त्यासाठी नऊ मॉड्युलर ऑपरेशन थिएटर उभारण्याचा निर्णय घेतला आहे. केईएम रुग्णालयात पाच तर सायन आणि नायर रुग्णालयात प्रत्येकी दोन कक्ष असणार आहेत. प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, प्लास्टिक सर्जरी, लहान मुलांच्या दुर्धर शस्त्रक्रियांचा समावेश केला असून शस्त्रक्रिया करताना रुग्णांना जंतुसंसर्गाची शक्यता देखील कमी राहण्यास मदत होणार आहे, अशी माहिती पालिका प्रमुख रुग्णालय संचालक डॉ. अविनाश सुपे यांनी दिली.
मुंबई महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमध्ये अत्यल्प दरात चांगली वैद्यकीय सेवा दिली जाते. महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमध्ये अनेक सामान्य व गरजू रुग्ण विविध वैद्यकीय उपचारांसाठी येत असतात. आवश्यकतेनुसार या रुग्णांवर शस्त्रक्रिया देखील करावी लागते. यासाठी महापालिका रुग्णालयातील विविध विभागात शस्त्रक्रिया कक्ष आहेत. या शस्त्रक्रिया कक्षांपैकी ९ शस्त्रक्रिया कक्ष आता अत्याधुनिक अशा 'मॉड्युलर ऑपरेशन थिएटर' मध्ये रूपांतरित करण्यात येणार आहेत. याकरिता पालिकेने सन २०१७ – १८ च्या अर्थसंकल्पीय अंदाजात २१ कोटी ५० लाख रुपयांची तरतूद प्रस्तावित केली आहे. यानुसार येत्या डिसेंबर पर्यंत केईएम रुग्णालयातील ५, तर नायर रुग्णालय आणि लोकमान्य टिळक रुग्णालयात प्रत्येकी २ ऑपरेशन थिएटरचा कायापालट केला जाणार आहे.

असे असेल कक्ष मॉड्युलर ऑपरेशन थिएटरच्या भिंती व छत विशिष्ट गुणवत्तेच्या स्टेनलेसस्टील पासून तयार केलेल्या असतील. यावर विशिष्ट प्रकारचा जंतुप्रतिबंधक रंग लावण्यात येणार असून हा रंग जीवाणु प्रतिबंधक व बुरशी-प्रतिबंधक असेल. जेणेकरून थिएटरमध्ये रुग्णाला जंतुसंसर्ग होणार नाही, याची खबरदारी घेतली जाणार आहे. तसेच त्याचे बांधकाम 'प्री-फॅब्रीकेटेड' पद्धतीचे असल्याने अत्यंत कमी कालावधीत उभारण्यास मदत होणार आहे. अत्याधुनिक दिवे, दरवाजे, ऑपरेशन कंट्रोल पॅनल, क्ष-किरण यंत्रणा, ऑपरेशन टेबल इत्यादी सुविधा यात असतील. शिवाय, हवेच्या माध्यमातून होणाऱ्या संभाव्य जंतुसंसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी हवा शुद्ध करणारे अत्याधुनिक यंत्र येथे बसवले जाणार असल्याची माहिती, डॉ. सुपे यांनी दिली.

येथे असेल मॉड्यूलर सेंटर मुंबईतील परळ येथील पालिकेच्या के.ई.एम. रुग्णालयातील ५ शस्त्रक्रिया कक्ष, मुंबई सेंटर येथील नायर रुग्णालयातील २ शस्त्रक्रिया कक्ष याचप्रमाणे शीव (सायन) परिसरातील लोकमान्य टिळक महापालिका सर्वसाधारण रुग्णालयातील २ कक्ष 'मॉड्युलर ऑपरेशन थिएटर'मध्ये रूपांतरित करण्यात येणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने मूत्ररोगचिकित्साशास्त्र विभाग (यूरॉलॉजी), बालरोग शल्यचिकित्सा विभाग आणि प्लास्टीक सर्जरी (सुघटन शल्यचिकित्सा) इत्यादी समावेश केला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad