मुंबई (प्रतिनिधी)- महापालिका रुग्णालयात योग्य सुविधांचा अभाव, परिचारिक व डॉक्टरांची कमतरता, तज्ञ डॉक्टर मिळत नाहीत, असा आरोप बुधवारी स्थायी समितीत सदस्यांनी केला. यावेळी नव्याने बांधण्यात येणाऱ्या सुपरस्पेशालिस्ट रुग्णालयांकडे प्रशासनाने केलेल्या दुर्लक्ष व समस्यांचा पाढा वाचला. दरम्यान, प्रशासनाने रिक्त पदे असल्याचे मान्य केले.
मुंबई महापालिका रुग्णालयांची अवस्था बिकट आहे. वैद्यकिय सुविधा पुरविण्यासाठी अर्थसंकल्पात कोट्यवधी रुपयांची तरतूद केली जाते. परंतु, रुग्णांना योग्य सुविधा देण्यास प्रशासन अपयशी ठरत आहे. सेवा सुविधा पुरविताना दुजाभाव केला जातो. उपनगरात तर असे प्रकार सर्रास होतात. उपनगरात नव्याने बांधलेल्या कुपर रुग्णालयात डॉक्टर व परिचारिकांची संख्या कमी आहे. तज्ञ डॉक्टर येण्यास तयार होत नाहीत, असा आरोप शिवसेनेच्या नगरसेवका राजूल पटेल यांनी केला. हिंदूहृद्यसम्राट बाळा साहेब ठाकरे कुपर रुग्णालयात हंगामी पदे कायम ठेवण्याचा प्रस्ताव सभेत मंजुरीसाठी आला होता. यावर हरकत घेत पटेल यांनी रुग्णालयातील समस्यांचा पाढा वाचला. येथील शवागार विभाग भाड्यातत्वावर दिले आहे. यामुळे लोकांचे हाल होतात. हा विभाग पालिकेने प्रथम ताब्यात घ्यावा. तसेच तज्ञ डॉक्टर पालिका रुग्णालयाकडे वळावे याकरिता धोरणात शिथीलता आणावी, अशी जोरदार मागणी त्यांनी केली.
रुग्णालयात किती व कोणती पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्यास प्रशासन गंभीर आहे का, असा प्रश्न विचारत मंगेश सातमकर यांनी तात्काळ कारवाईची मागणी केली. शताब्दी कांदीवली, गोवंडी, भगवती रुग्णालयाबाबत मागील दोन वर्षापासून पाठपुरावा सुरु आहे. परंतु, प्रशासन याकडे वारंवार दुर्लक्ष करत आहे. छोट्या रुग्णालयात दर्जेदार व योग्य प्रकारची सेवा मिळत नसल्याने रुग्णांना केईएम, नायर आणि शीव रुग्णालयात उपचार्थ पाठवले जाते. परिणामी रुग्णांलयासेववर ताण पडतो तो कमी करण्यासाठी रिक्त पदे भरण्यास प्रशासनाने प्राधान्य द्यावे. हंगामी कर्मचारी पदे की कायम स्वरुपी याचा खुलासा करावा व त्याबाबतचा अहवाल स्थायी समितीला सादर करावा, अशी मागणी नगरसेवकांनी केली. यावेळी रुग्णालयातील जेवणाच्या दर्जावर प्रश्न उपस्थित केला. मनसे नगरसेवक दिलीप मामा लांडे, शिवसेनेचे मंगेश सातमकर, शुभदा गुडेकर, सपाचे रईश शेख, राजेश्री शिरवाडकर आदींनी रुग्णालयातील आक्षेप घेत प्रशासनाला धारेवर धरले.
दरम्यान, मेडिकल व कुपर रुग्णालयात मिळूण २९० पदे रिक्त आहेत. १ हजार २९६ पदांपैकी एक हजार पदे भरण्यात आल्याचा खुलासा पालिका अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे यांनी केला. शासनाच्या मार्गदर्शकानुसार एमपीएससी धोरणाअंतर्गत नवी पदे भरली जाणार आहेत. कुपर येथील शवागर राज्य सरकारच्या ताब्यात असून तो ताब्यात घेण्यासाठी पत्र व्यवहार सुरू आहे. मात्र रिक्त पदे भरताना तीन वर्षे सहा महिने हंगामी तत्वावर घेण्यात येत असल्याचे दराडे यांनी स्पष्ट केले.
रुग्णांच्या जेवणाची प्रशासनाने चव चाखावी -पालिका रुग्णालयातील रुग्णांना अतिशय निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जाते. पुरवठादार प्रशासकीय व रुग्णांच्या जेवणात भेदभाव करतो. कोट्यवधी रुपये जेवणावर खर्च करून ही रुग्णांना योग्य प्रकारे जेवण मिळत नाही. त्यामुळे पालिका आयुक्तांसह सर्वच अधिकाऱ्यांनी व नगरसेवकांनी रुग्णांच्या जेवणाची एकदा तरी चव चाखावी. त्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा, अशी सुचना भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी केली. तसेच पारदर्शकतेचा मुद्दा असल्याचे सांगत कोटक यांनी शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला हाणला.
No comments:
Post a Comment