आंबेडकर भवन पाडणाऱ्या रत्नाकर गायकवाड यांना मारहाण - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 April 2017

आंबेडकर भवन पाडणाऱ्या रत्नाकर गायकवाड यांना मारहाण


औरंगाबाद - आंबेडकरी चळवळीचे केंद्र बिंदू असलेले मुंबईच्या दादर येथील आंबेडकर भवन पाडल्याच्या रागातून राज्याचे मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांना सोमवारी (ता.17) दुपारी तीनच्या सुमारास भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली.

मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड हे पत्नीसह सोमवारी औरंगाबादेत आले होते. सकाळी 11 वाजता विभागीय माहिती कार्यालयाला भेट दिल्यानंतर दुपारी गायकवाड आपल्या पत्नीसह सुभेदारी विश्रामगृहात थांबले होते. दुपारी तीनच्या सुमारास भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमित भुईगळ हे कार्यकर्त्यासह सुभेदारीत आले आणि त्यांनी थेट गायकवाडांना मारहाण करण्यास सुरुवात केली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे पोलिसांनी धाव घेतली आणि भुईगळसह इतर कार्यकर्त्यांनी ताब्यात घेतले. मुख्य आयुक्तांना मारहाण झाल्याचे कळताच वरिष्ठ पोलिस अधिकारी सुभेदारीवर दाखल झाले. या प्रकरणी पोलिसांनी अमित भुईगळ, दिनेश साळवे, शांता धुळे, रेखा उदगीरे, गौतम गवळी आदी कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या विरोधात बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खुनाचा प्रयत्न करण्याचा (कलम ३०७) गुन्हा दाखल झाला आहे. याशिवाय दंगलीचा (कलम १४७, १४८, १४९) तसेच सरकारी कामात अडथळा आणून दहशत निर्माण करणे आदी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

चळवळीचे केंद्र बिंदू पाडणाऱ्या रत्नाकर गायकवाड यांना मारहाण झाल्याने आंबेडकरी जनतेमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. आंबेडकरी समाजा विरोधात काम करणाऱ्या अश्या अधिकाऱ्यांना यापुढे अशीच शिक्षा देऊन सरळ करण्याची गरज असल्याचे मत आंबेडकरी जनतेमधून व्यक्त केले जात आहे. तर रत्नाकर गायकवाड यांना मारहाण करणे चुकीचे असल्याचे मत शासकीय व माजी शासकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. यामुळे आंबेडकर भवन पाडल्या नंतर आंबेडकरी जनता आणि शासकीय अधिकारी यांच्यामध्ये असलेली उभी फूट आजही तशीच असल्याचे दिसत आहे.

आंबेडकर भवनाचा वाद
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीचे केंद्र असलेली दादर येथील इमारत मोडकळीस आल्याने सदर आंबेडकर भवन आणि त्यालगतची प्रिंटींग प्रेस २५ जून २०१६ च्या रात्री जमीनदोस्त करण्यात आली. एका रात्रीतून अचानक आंबेडकर भवन पाडण्यात आल्याने समाजात तीव्र प्रतिक्रीया उमटल्या. आंबेडकर भवनाच्या मालकीवरुन ‘दी पीपल्स् इम्प्रव्हमेंट ट्रस्ट’चे विश्वस्त आणि बाबासाहेबांच्या नातंवंडामध्ये संघर्ष सुरू आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्य समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी स्वातंत्र्यपूर्व काळात ‘दी बॉम्बे शेड्युल्ड कास्ट इम्प्रव्हमेंट ट्रस्ट’ची स्थापना केली. १९४४ जनसहभागातून जमा झालेल्या निधीतून या ट्रस्टच्या माध्यमातून दादर येथे सामाजिक केंद्रासाठी भूखंड घेतले. सध्या आंबेडकर भवन म्हणून ओळखली जाणारी दादरमधील ही वास्तू पुढे डॉ. बाबासाहेबांच्या सर्व लढ्याचे केंद्रबिंदूच ठरली. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतरही ‘आंबेडकर भवन’ ही वास्तू दलित चळवळीचे केंद्र ठरले. पुढे या वास्तूची मालकीवरुन ट्रस्ट आणि आंबेडकरांच्या वारसदारांमध्ये खटके उडत राहीले.

दरम्यान, स्वातंत्र्यपूर्व काळातील ही वास्तू धोकादायक ठरल्याने मुंबई महापालिकेने १ जून २०१६ रोजी आंबेडकर भवनला नोटीस बजावली. या नोटीसीच्या आधारे ट्रस्टने २५ जून रोजी एका रात्रीतून आंबेडकर भवन आणि लगतच्या प्रिटींग प्रेसची इमारत जमीनदोस्त केली. ट्रस्टने तडकाफडकी केलेल्या या कामामुळे मोठा वाद पेटला. राज्याचे माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांचा ट्रस्ट आणि प्रकाश व आनंदराज या आंबेडकरांच्या नातवंडामध्ये संघर्ष उभा राहीला. तर, बाबासाहेबांशी संबंधित पुरातन वास्तू तडकाफडकी पाडण्यात आल्यामुळे दलित समाजातही तीव्र नाराजीची भावना निर्माण झाली. सुरुवातीला प्रकाश आंबेडकर यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंबेडकर भवन पाडण्यात राज्य सरकारची कोणतीच भूमिका नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. पाडकाम करणा-यांच्या चौकशीचे आदेश दिले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad