मुंबई ( प्रतिनिधी ) – मुंबईत येत्या काही दिवसात शाळांना सुट्टी पडणार असून आता शाळेच्या उन्हाळी सुट्टी पडणार आहेत. परंतु महापालिकेची तरण तलावेच बंद असल्यामुळे उन्हाळी सुट्टीत पोहोण्याची मजा शाळकरी मुलांना लुटता येणार नाही. त्यामुळे सुट्टीमध्ये मुलांची आणि पालकांची मोठी गैरसोय होणार असल्यामुळे महापालिकेची सर्व तरण तलावे त्वरित सुरू व्हावीत, अशी मागणी भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी सोमवारी महापालिका सभागृहात केली.
राजे शहाजी क्रीडा संकुलातील खर्चाच्या लेखशीर्षाच्या प्रस्तावावर बोलतांना भाजपा गटनेते मनोज कोटक यांनी ललित क्रीडा व कला प्रतिष्ठानच्यावतीने अंधेरी राजे शहाजी क्रीडा संकुलातील तरण तलाव आणि शिवाजी पार्क येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय जलतरण तलाव चालविल्या जातात. पण ही दोन्ही तलाव बंद असल्याची बाब निदर्शनास आणून दिली.तसेच मुलुंड तलाव एक दिवसाआड बंद ठेवले जाते. त्यात पुरेसे पाणीही नसते. त्यामुळे ललित क्रीडा व कला प्रतिष्ठानच्यावतीने या तलावांची योग्य देखभाल केली जात नसल्याचे त्यांनी सांगितले. मुख्य घटनेला बगल देत प्रतिष्ठानच्यावतीने अधिक खर्च केला जात आहे. त्यामुळे हे एक सफेद हत्ती सारखे झाले आहे. प्रतिष्ठान कडून योग्य देखभाल होत नसल्यामुळे वारंवार महापालिकेला खर्च करावे लागते. मात्र, कोट्यवधी रुपये खर्च करूनही महापालिकेची बदनामी होत आहे. जर ही तलावे बंद राहिली तर सर्वसामान्याच्या मुलांनी कुठे जावे, असा सवाल त्यांनी केला. त्यामुळे प्रतिष्ठानच्या विश्वस्तांवर अंकुश ठेऊन ही तरण तलावे मुलांची उन्हाळी सुट्टी लागू होण्याआधी सुरू व्हावीत, अशी आग्रही मागणी करत मनोज कोटक यांनी महापौरांना प्रशासनाला निर्देश देण्याची सूचना केली.
यावेळी अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी सदस्यांच्या मागणीची दखल घेऊन जिथे जिथे तरण तलाव बंद असतील ते त्वरित सूर करण्याचे निर्देश दिले जातील, असे आश्वासन सभागृहाला दिले.