मार्च महिन्याचा पगार महापालिका देणार -
मुंबई / प्रतिनिधी - आर्थिक तोट्यात असलेल्या बेस्ट उपक्रमाला आर्थीकी तोट्यातून बाहेर काढण्याचा निर्णय आज झालेल्या गटनेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत बेस्ट कर्मचाऱ्यांना मिळणारे भत्ते तसेच प्रवाश्याना मिळणाऱ्या मोफत प्रवासाच्या सुविधा बंद करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. बेस्टला आर्थिक तोट्यातून वाचवण्यासाठी कृती आराखडा बनवण्यात आला आहे. यावर चर्चे दरम्यान सूचना करताना मार्च महिन्याचे बेस्ट कर्मचाऱ्यांचे वेतन पालिका देईल असा दिलासा पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिल्याची माहिती सभागृह नेते यशवंत जाधव यांनी दिली. मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेला बेस्ट उपक्रम आर्थिक तोट्यात आहे. बेस्टला आर्थिक तोट्यातून बाहेर काढण्यासाठी कृती आरखडा पालिका गटनेत्यांच्या बैठकीत सादर करण्यात आला. या आराखड्यावर चर्चा केल्यावर बेस्टला काही गंभीर उपाय योजना करण्यास सांगण्यात आल्या आहेत. बेस्ट मधून यापुढे फक्त पालिका शाळांमधील मुले व स्वातंत्र्य सैनिकांनाच मोफत प्रवास दिला जाईल. इतर मोफत प्रवासाच्या सवलती तूर्तास बंद करण्यास संगबण्यात आल्या आहेत. वातानुकूलित बसेस घाट्यात चालत असल्याने व त्यावरील खर्च जास्त असल्याने या बसेसही बंद करण्यास सांगण्यात आले आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांना व त्यांच्या पाल्याना शिष्यवृत्ती, बक्षीस, वैद्यकीय भत्ता, व इतर भत्ते दिले जातात सध्या याला स्थगिती देण्यास सांगण्यात आले आहे. बेस्टमार्फत प्रवाश्याना दिल्या जाणाऱ्या सवलती व कर्मचाऱ्यांना दिले जाणारे भत्ते बेस्ट पुन्हा आर्थिक तोट्यातून बाहेर आल्यावर पुन्हा चालू केले जातील. ज्या मार्गावर कमी प्रवासी आहेत त्या मार्गावरील बसेस बंद करताना या बसेस जास्त प्रवासी असलेल्या मार्गावर चालवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. गटनेत्यांच्या बैठकीत ज्या सूचना करण्यात आल्या आहेत त्यांचा समावेश करून अतिरिक्त आयुक्त संजय मुखर्जी व बेस्ट महाव्यवस्थापक जगदीश पाटील कृती आराखड्यावर आधारित एक प्रस्ताव तयार करतील. हा प्रस्ताव बेस्ट समितीमध्ये पुढील आठवड्यात सादर केला जाणार आहे. बेस्ट समितीच्या मंजुरी नंतर हा प्रस्ताव पालिकेकडे स्थायी व सभागृहामध्ये सादर केला जाईल असे सभागृह नेते यशवंत जाधव यांनी सांगितले. प्रवासी व कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सवलती व भत्ते बंद केल्यास बेस्टचे वर्षाला २१ कोटी रुपये वाचतील अशी माहिती बैठकीत देण्यात आल्याचे जाधव यांनी सांगितले.