मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांना ‘बेस्ट बस’ने मोफत प्रवास करता यावा म्हणून मालाड (पश्चिम) ते इराणीवाडी, कांदिवली या दरम्यान प्रायोगिक तत्त्वावर शिक्षण समितीच्या अध्यक्षा शुभदा गुढेकर यांच्या हस्ते ‘बेस्ट बस’चा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मालाड (पश्चिम) येथील महापालिकेच्या विद्यार्थ्यांनी मोठा प्रतिसाद दिला.
वळणई वसाहत महापालिका शाळेची इमारत मोडकळीस अाल्याने पुर्णपणे पाडण्यात आली आहे. त्यामुळे या शाळेतील १००० ते १२०० विद्यार्थ्यांचे स्थळांतर कांदिवली पश्चिमेकडील इराणीवाडी क्रमांक ३ याठिकाणी करण्यात आले आहे. आता १५ जूनपासून सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रांत बससेवा सुरू करण्यात येणार असल्याचे गुडेकर यांनी सांगितले.
या सुविधेमुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. शिक्षण समिती अध्यक्षांनी विद्यार्थ्यांबरोबर बसमधून प्रवास केला आणि त्यांच्या भावना जाणून घेतल्या. यावेळी उपशिक्षणाधिकारी सुजाता खरे, प्रशासकीय अधिकारी अशोक मिश्रा, कांदिवलीचे शाखाप्रमुख दीपक मोरे आणि शिवसेनेचे पदाधिकारी आणि पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
दूरच्या शाळांसाठी लवकरच बससेवा मुंबईतील अनेक शाळा खूप दुरच्या अंतरावर आहेत. तेथे वाहतुकीची योग्य सुविधाच नाही. त्यामुळे मोठ्या संख्येने विद्यार्थी शाळेतच जात नाही. हे लक्षात घेऊन मुंबईत स्थलांतरीत झालेल्या दूरच्य अंतरावरील शाळांसाठी प्राधान्याने महापालिकेच्या वतीने मोफत बससेवा सुरू करा, असे निर्देशही शिक्षण समिती अध्यक्षा शुभदा गुडेकर यांनी शिक्षण अधिका-यांना दिले.