मुंबई, दि. 19 : आदिवासी विकास विभागाच्या धर्तीवर वसतीगृहातील विद्यार्थ्यांना भोजन पुरवठा करण्याच्या संदर्भात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या मुंबईतील सात वसतीगृहात सेंट्रल किचन प्रायोगिक तत्वावर राबविणार असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी आज येथे दिली.
‘सेंट्रल किचन’ स्थापन करण्याबाबत आज मंत्रालयात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुरेंद्र बागडे, समाजकल्याण आयुक्त पियुष सिंह, अवर सचिव दि.रा. डिंगळे, प्रादेशिक उपायुक्त यशवंत मोरे, सह आयुक्त पुणे श्रीमती विजया पवार तसेच संबंधित विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
बडोले म्हणाले की, आदिवासी विकास विभागाच्या धर्तीवर वसतीगृहातील विद्यार्थ्यांना भोजन पुरवठा टाटा ट्रस्टच्या माध्यमातून केला जातो. त्या अनुषंगाने मुंबईतील सामाजिक न्याय विभागाच्या सर्वच वसतीगृहात सेंट्रल किचन हा उपक्रम प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यासाठी अक्षयपात्र, या संस्थेचे सहकार्य घेण्यात येणार आहे. आपण दिलेल्या सामाजिक न्याय विभागाच्यावतीने वसतीगृहाच्या मेनूप्रमाणे अक्षयपात्र संस्था भोजन बनवून मुंबईतील 40 कि.मी.च्या आत स्वखर्चाने वसतीगृहात पोहोचविणार आहे. वाहतूकीचा खर्च संस्था स्वत: उचलणार असून भोजनाचा जो खर्च आहे त्याचा 50 टक्के भार ही संस्था उचलणार आहे.
स्वच्छ भारत अभियान मोहिमेंतर्गत राज्यभरातील 35 हजार विद्यार्थ्यांना प्रतिष्ठित कंपनीच्या वतीने मोफत हॅन्डवॉश देण्यात येणार असल्याची माहिती संस्थेच्या प्रतिनिधींनी दिली.
No comments:
Post a Comment