मुंबई ( प्रतिनिधी ) – मुंबई पालिकेच्या आर्थिक वर्ष २०१७ – २०१८ च्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये सर्वसामान्यांना अधिक गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा मिळण्याच्या दृष्टीने विविध तरतूदी प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. यामध्ये 'आपली चिकित्सा' ही गोरगरिबांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची ठरु शकेल अशी सुविधा प्रस्तावित करण्यात आली आहे. या सुविधेअंतर्गत महापालिकेची उपनगरीय रुग्णालये, विशेष रुग्णालये, प्रसूतिगृहे आणि दवाखान्यांच्या येणा-या रुग्णांना आवश्यकतेनुसार कराव्या लागणा-या विविध वैद्यकीय चाचण्यांसाठी खाजगी प्रयोगशाळांची मदत घेण्याचे महापालिका प्रशासनाने प्रस्तावित केले आहे. याकरिता या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये एकूण १६.१५ कोटींची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे.
पालिका रुग्णालये, दवाखाने, प्रसूतिगृहे इत्यादींच्या माध्यमातून विविध स्तरावरील वैद्यकीय सेवा सुविधा सर्वसामान्यांना देत असते. या रुग्णालयांमध्ये, प्रसूतिगृहांमध्ये वा दवाखान्यांमध्ये येणा-या रुग्णांना आवश्यकतेनुसार वैद्यकीय चाचण्या कराव्या लागतात. मात्र वैद्यकीय चाचण्यांची सुविधा ही प्राधान्याने महापालिकेच्या मोठ्या रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहे. यामुळे अनेकवेळा गोरगरीब रुग्णांना केवळ वैद्यकीय चाचणीसाठी महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमध्ये यावे लागते. ज्यामुळे या रुग्णांना प्रवासाचा त्रास होण्यासोबतच मोठ्या रुग्णालयांवरचा ताण वाढत आहे महापालिकेची उपनगरीय रुग्णालये (छोटी रुग्णालये), विशेष रुग्णालये, प्रसूतिगृहे व दवाखाने या ठिकाणी येणा-या रुग्णांच्या वैद्यकीय चाचण्यांसाठी खाजगी प्रयोगशाळांची मदत घेण्याचे महापालिका प्रशासनाने प्रस्तावित केले आहे. याअंतर्गत निविदा प्रक्रियेअंती निवड होणा-या संस्थेला महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये येऊन चाचणी नमूना घेऊन जाणे बंधनकारक असणार आहे, ज्यामुळे रुग्णांना रुग्णालयाच्या बाहेर न जाताही वैद्यकीय चाचणी सेवा उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर 'आपली चिकित्सा' अंतर्गत रुग्णांचा वैद्यकीय चाचणी अहवाल वेळेत आणि सुलभपणे मिळावा, यासाठी इ-मेल किंवा एसएमएस द्वारे वैद्यकीय अहवाल महापालिकेच्या संबंधित डॉक्टरांना मिळू शकेल, अशीही तरतूद असणार आहे. परिणामी महापालिकेच्या डॉक्टरांना देखील रुग्णांबाबत योग्य ते निदान करुन औषधोपचार करणे तुलनेने सुलभ होणे शक्य होणार आहे अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे