मुंबई, दि. 19 : शासकीय वाहनांवरील लाल दिव्याच्या वापरावर केंद्रीय मंत्रिमंडळाने घातलेल्या निर्बंधांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले असून त्याची वैयक्तिक पातळीवर तात्काळ अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. आज पुणे दौऱ्यावर असताना या निर्णयाची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी आपल्या शासकीय वाहनावरील लाल दिवा काढून टाकण्याचे आदेश दिले.
केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी 1 मे पासून होणार असली तरी मुख्यमंत्र्यांनी आजपासूनच गाडीवर लाल दिवा वापरणे बंद केले आहे. व्हीआयपी संस्कृतीला चाप लावण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी उचललेल्या या महत्त्वाच्या निर्णयाचे महाराष्ट्र सरकार स्वागत करीत असून आपण शासकीय वाहनावर लाल दिवा (Red Beacons) लावणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करून त्याची पुणे दौऱ्यात तात्काळ अंमलबजावणीही केली. या निर्णयामुळे लोकशाही अधिक बळकट होण्यास मदत होणार आहे, अशी आशाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.
महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गाडीवरचा लाल दिवा काढला
मंत्री आणि अधिकारी यांच्या गाडीचा लाल दिवा दि. १ मे २०१७ पासून काढण्यात येणार असल्याचा आज केंद्रीय मंत्रीमंडळाने निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वागत करून आपल्या गाडीवरचा लाल दिवा तत्काळ काढून टाकला.
पाटील हे आज आपला वाशी येथील नियोजित कार्यक्रम आटोपून आपल्या शासकीय निवासस्थानी पोहचण्यापूर्वीच आपल्या गाडीवरील लाल दिवा काढण्यासाठी मेकॅनिकला बोलावून ठेवण्यात आले होते. निवासस्थानी पोहचल्याबरोबर त्यांनी तत्काळ आपल्या गाडीवरील लाल दिवा काढला.
या निर्णयाबद्दल बोलताना पाटील म्हणाले की, पुर्वापार सुरु असलेली दौऱ्यावर आलेल्या मंत्री महोदयांना पोलीसांमार्फत देण्यात येणारी सलामी बंद करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच घेतला आहे. आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मंत्र्यांच्या गाड्यांवरील लाल दिवा काढण्याच्या निर्णयाचे आम्ही सर्व स्वागत करतो. त्याचबरोबर या निर्णयाची अंमलबजावणी आजपासूनच करीत असल्याचे पाटील यांनी सांगितले.
ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी गाडीवरचा लाल दिवा काढलामंत्री आणि अधिकारी यांच्या गाडीचा लाल दिवा दि. १ मे २०१७ पासून काढण्यात येणार असल्याचा आज केंद्रीय मंत्रीमंडळाने निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वागत करून आपल्या गाडीवरचा लाल दिवा तत्काळ काढून टाकला.
बावनकुळे राळेगणसिध्दी येथे ज्येष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांच्या सोबत अवैध दारू बंदी संदर्भातील नियोजित बैठकसाठी गेले होते, त्यावेळी बावनकुळे यांना लाल दिवा काढण्यासंदर्भात केंद्र शासनाने निर्णय घेतला आहे. अशी माहिती समजली आणि बावनकुळे यांनी या निर्णयाचे स्वागत करून आपल्या गाडीवरचा लाल दिवा तात्काळ काढून लाल दिवा नसलेल्या गाडीने प्रवास सुरू केला.
No comments:
Post a Comment