मुंबई - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १२६वा जयंती उत्सव अमेरिकेत न्यूयॉर्क येथे संयुक्त राष्ट्र संघाच्या मुख्यालयात मानव अधिकार संघटनेतर्फे साजरा होत आहे. या सोहळ्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच १५ एप्रिल रोजी वॉशिंग्टन येथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. अमेरिकेच्या सामाजिक न्याय आणि अपंग साहाय्य विभागाच्या मंत्र्यांशीही आठवले यांची भेट होणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस येथील फिरोजशाह मेहता सभागृहात झालेल्या एका कार्यक्रमात आठवले यांनी ही माहिती दिली.
मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांशी थेट संवाद कार्यक्रमात आठवले यांनी सांगितले की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा रिपब्लिकन पक्ष आणि भारतात आपलासुद्धा रिपब्लिकन पक्ष हा समान धागा असल्याने आपण ट्रम्प यांचे अभिनंदन कारणार आहोत. माझा रिपब्लिकन पक्ष छोटा असला तरी माझ्या रिपब्लिकन पक्षाची उद्दिष्ट्ये, तत्त्व महान असल्याचे ते म्हणाले. मुंबई विद्यापीठातील विद्यार्थी आणि प्राध्यापकांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी संसदेचे अधिवेशन संपल्यानंतर मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू आणि रजिस्टार यांची बैठक घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले. या वेळी विद्यार्थ्यांनी आठवलेंना थेट प्रश्न विचारले. त्या सर्व प्रश्नांची दिलखुलास उत्तरे आठवलेंनी दिली. आर्थिक निकषावर २५ टक्के आरक्षण देण्यात यावे, त्यासाठी आरक्षणाची र्मयादा वाढवावी, अशी आपली भूमिका आहे. पदोन्नतीतील आरक्षणाचे विधेयक संसदेत मंजूर करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, असे सांगतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'सबका साथ सबका विकास'च्या धोरणास आपला पाठिंबा आहे. आपण जरी मोदींच्या मंत्रिमंडळात भाजपाशी युती केली असली तरी आपल्या हातात निळा झेंडा आणि आंबेडकरी तत्त्वज्ञान आहे.