मुंबई / प्रतिनिधी - मुंबई महापालिकेच्या बुधवारच्या स्थायी समितीत सत्ताधारी शिवसेनेला शाळांमधील टेबल आणि खुर्च्याचा प्रस्ताव रेकोर्ड करण्यास भाजपाने भाग पाडले असताना गुरुवारी शिवसेनेने बेस्टमध्ये डिझेल पुरवठा करण्याचे कंत्राट रिलायंसला देण्याचा प्रस्ताव रद्द करून भाजपाचा बदला घेतला आहे.
बेस्ट आर्थिक संकटात असताना बेस्टला लागणाऱ्या डिझेलचा पुरवठा करण्याचे दोन प्रस्ताव होते. यातील 72 हजार किलो लिटर डिझेल पुरवठा करण्यास काही दिवसा पुर्वीच बेस्ट समितीने मंजूरी दिली होती. मग पुन्हा 12 हजार किलो लिटरचा प्रस्ताव का आणला ? हा प्रस्ताव फ़क्त रिलायंसला बेस्टमध्ये घुसवण्यासाठीच आणला असल्याने या प्रस्तावाला मंजूरी देवू नए अशी मागणी कॉंग्रेसचे रवी राजा यांनी दिला.
भाजपाचे सुनील गणाचार्य यांनी बेस्टने 72 हजार किलोलिटर डिझेल सरकारी कंपनीकडून घेतले. त्यावेळी कोणत्याही प्रकारची सुट दिलेली नसताना प्रस्ताव मंजूर करण्यात आला. आता दोन डेपोमध्ये प्रायोगिक तत्वावर 12 हजार किलोलिटर डिझेल घेतले जाणार आहे. त्यासाठी रिलायंसने इतर कंपन्यापेक्षा जास्त दिड टक्के सुट देणार आहे. आर्थिक घाट्यात असलेल्या बेस्टने उपक्रमाचे हित होत असल्याने हा प्रस्ताव मंजूर करावा अशी मागणी केली.
या प्रस्तावावर बोलताना शिवसेनेचे सुहास सामंत यांनी कॉंग्रेसच्या रवी राजा यांच्या प्रस्ताव रद्द करण्याच्या मागणीला पाठिंबा देत प्रस्ताव रेकॉर्ड करण्याची उपसूचना मांडली. या उपसुचनेच्या बाजूने शिवसेनेच्या 5 व कॉंग्रेसच्या 1 अश्या 6 तर उपसुचने विरोधात भाजपाच्या 4 सदस्यानी मत दिले. उपसुचना बहुमताने मंजूर झाल्याने हा प्रस्ताव रेकॉर्ड करण्याचे आदेश बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी दिले.