मुंबई - परभणी जिल्ह्यातील पुर्णा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आयोजित मिरवणुकीवर जातीवादातून समाजकंटकांकडून दगडफेकी करण्यात आली. या घटनेतील दगडफेक करणाऱ्या आरोपींना पकडण्याचे सोडून पोलिसांकडून मिरवणुकीत सहभागी झालेल्या २५ बौध्द तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा योग्य तपास होत नसल्याने तसेच दंगल घडवू पाहणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांना पाठीशी घातले जात असल्याने आंबेडकरी जनतेमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे. यामुळे आंबेडकरी संघटनांच्या वतीने २३ एप्रिलला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बांद्रा कला नगर येथील "मातोश्री"वर मोर्चा काढला जाणार आहे. तर २६ एप्रिल रोजी मंत्रालयाचा रास्ता रोको आंदोलन केले जाणार आहे.
पूर्णा येथील डॉ. आंबेडकर जयंती निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर एका विशिष्ठ समाजाच्या विभागात हि मिरवणूक आली असता दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत एका ६० वर्षीय व्यक्तीचा मृत्यु झाला असून याप्रकरणी बौध्द तरुणांना पोलीस धरपकड करत आहे. निष्पाप बौध्द तरुणांना अटक करण्यात आलेली आहे. पोलिसांतर्फे करण्यात आलेली कारवाई योग्य नसून खऱ्या आरोपींवर प्रशासनाने कारवाई करने आवश्यक आहे. अन्यथा राज्यभर आंबेडकरी जनता द्वारेच तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि याला पूर्ण जवाबदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहतील, असा इशारा संविधान गौरव बहुजन महामोर्चाचे प्रमुख अशोक कांबळे यांनी कांबळे यांनी दिला आहे.
पुर्णा दगडफेकीच्या घटनेमागे परभणी जिल्ह्यातील शिवसेना पक्षाच्या बड्या नेत्यांचा हात आहे. त्यामुळे शिवसेना पक्षाने जातिवादी नेत्यांना आपल्या पक्षात थारा न देता त्यांना पक्षातून त्वरित काढून टाकावे. त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या मोर्चाद्वारे शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे केली जाणार आहे. २३ एप्रिलच्या मोर्चामध्ये संविधान गौरव बहुजन महामोर्चा आणि आंबेडकरी ब्रिगेड ही संघटना सहभागी होणार असून मुंबई आणि महाराष्ट्रातील तमाम आंबेडकरी पक्ष व संघटनांचे नेते, कार्यकर्ते, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रात काम करणारे व तसेच सर्व उपासकांनी या मोर्चा मध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन संविधान गौरव बहुजन महामोर्चाचे प्रमुख अशोक कांबळे यांनी केले आहे.
मंत्रालयासमोर रास्तारोको -
परभणी जिल्ह्यातील पुर्णा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आयोजित मिरवणुकीवर जातीवादातून समाजकंटकांकडून दगडफेकी करण्यात आली. या घटनेतील दगडफेक करणाऱ्या आरोपींना त्वरित पकडण्यात यावे, त्यांच्यावर एट्रोसिटी एक्ट गुन्हा दाखल करावा. दगडफेक करणाऱ्यांना आरोपींना अटक करण्याऐवजी पोलिसांनी २५ बौध्द तरुणांना अटक केली आहे. पुर्णा येथील सिध्दार्थ नगर, आंबेडकर नगर, फुले नगर, भीमनगर, विजयनगर आणि रेल्वे कॉलनी येथील बौद्ध युवकांना सोडून द्यावे. ज्या पोलिसांनी या संदर्भातील कारवाईत दिरंगाई केली असेल अशा पोलीस अधिकारी आणि पोलीस अधिक्षक यांना तातडीने निलंबित करावे यासाठी २६ एप्रिल रोजी राज्यभर तीव्र आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलना दरम्यान मंत्रालयासमोर रास्ता रोको केला जाणार आहे. हे रास्तारोको आंदोलन रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचे मुंबई सरचिटणीस प्रशांत मोरे यांच्या नेतृत्वाखाली होणार असून बोरीवली रेल्वे स्थानकाचा रास्ता रोको हे आंदोलन रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचे कार्याध्यक्ष संदीप केदारे यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे अशी माहिती रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचे महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रशेखर कांबळे यांनी दिला आहे.
No comments:
Post a Comment