स्वाईन फ्लूबाबत सर्वेक्षणाची मोहीम तातडीने हाती घ्यावी - आरोग्यमंत्री - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 March 2017

स्वाईन फ्लूबाबत सर्वेक्षणाची मोहीम तातडीने हाती घ्यावी - आरोग्यमंत्री



मुंबई, दि. १६ : राज्यात स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव काही भागात वाढल्याचे निदर्शनास येत आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेने घरोघरी जाऊन सर्वेक्षणाची मोहीम तातडीने हाती घ्यावी. स्वाईन फ्लू प्रतिबंधक लसीकरणास गती द्यावी आणि आरोग्य शिक्षणासाठी जनजागृती अभियान सुरु करावे, असे निर्देश आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिले.
गेल्या तीन महिन्यात स्वाईन फ्लूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर विधानभवनात बैठक झाली. त्यावेळी आरोग्यमंत्री बोलत होते. आमदार विजय काळे, आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. विजय सतबीर सिंग, महाराष्ट्र साथ रोग नियंत्रण समितीचे अध्यक्ष डॉ. सुभाष साळुंखे, आरोग्य संचालक डॉ. सतीश पवार यावेळी उपस्थित होते.

राज्यात स्वाईन फ्लू वरील गोळ्या, औषधांचा मुबलक साठा आहे. रुग्णालयामध्ये व्हेंटिलेटर्सचा तुटवडा जाणवणार नाही याची दक्षता आरोग्य यंत्रणांनी घ्यावी, असे निर्देश देवून आरोग्यमंत्री म्हणाले की, राज्यात २०१६ मध्ये स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव जाणवला नाही. मात्र, यावर्षी तीन महिन्यातच १०३ रुग्ण आढळून आले असून त्यापैकी २६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यातील निम्मे रुग्ण हे पुणे शहर व विभागातील आहेत. यातील काही रुग्ण मधुमेह,उच्च रक्तदाब यासारख्या अन्य आजारांनी ग्रस्त असल्याने त्यांना स्वाईन फ्लूची लागण तीव्र गतीने झाली आहे. मार्चमध्ये रुग्णांची संख्या सर्वाधिक असून ही गंभीर बाब आहे. यंत्रणेने महापालिका प्रशासनाला सोबत घेऊन तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घ्यावी. नागरिकांना स्वाईन फ्लूबाबत आरोग्य शिक्षण देण्यासाठी जाणीवजागृती मोहीम हाती घ्यावी. यासाठी कृती आराखडा तयार करा, असेही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

पुणे महापालिका क्षेत्र, पुणे ग्रामीण, पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात तर कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, औरंगाबाद,परभणी या ठिकाणी रुग्णांची संख्या अधिक आढळून आली आहे. राज्य शासनाने अती जोखमीच्या व्यक्तींसाठी लसीकरण उपलब्ध केले आहे. सध्या दुसऱ्या व तिसऱ्या तिमाहीतील गरोदर मातांसोबतच मधुमेह आणि उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींना ती लस देण्यात येत आहे. गेल्या तीन महिन्यात 12 हजार 631 व्यक्तींना लसीकरण केले आहे. राज्यात स्वाईन फ्लूवरील औषधांचा साठा मुबलक असून कुठलाही रुग्ण औषधोपचारापासून वंचित राहता कामा नये. याची यंत्रणेने दक्षता घ्यावी असे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

Post Bottom Ad