नगरसेवकपद रद्द करण्यासाठी न्यायालयात जाणार - श्रीकांत भिसे ....
मुंबई - (प्रतिनिधी )-अस्तित्वात नसलेल्या इमारतीमधील शौचालय वापरात असल्याचे प्रमाणपत्र सादर करून निवडणूक जिंकलेल्या कुर्ला वार्ड क्रमांक १६९ येथील शिवसेना नगरसेविकेचे नगरसेवकपद रद्द करण्यात यावे अशी मागणी भाजप-आरपीआय ए -रासप व शिवसंग्राम महायुतीचे उमेदवार श्रीकांत भिसे यांनी केली आहे . हे प्रमाणपत्र देणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी राज्य निवडणूक आयोग, मुख्यमंत्री व मुंबई महानगरपालिकेकडे पत्र पाठवून केली असून सदर मागणीसाठी उच्च न्यायालयात जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान शौचालय प्रमाणपत्रासह सौ मोरजकर यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर करताना जात प्रमाणपत्र माहेरच्या नावाचे असून नावात बदल केल्याची शासकीय राजपत्र सादर केलेले नाही.अधिवास प्रमाणपत्रदेखील जोडले नसल्याची तक्रार भिसे यांच्यासह या प्रभागातील मनसे राष्ट्रवादी,भारिप बमसं यांच्या सह दोन अपक्ष उमेदवारांनी केली आहे. मुंबई महानगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत वार्ड क्रमांक १६९ कुणाला या अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या मतदारसंघातून प्रथम क्रमांकाची मते मिळवून प्रवीणा मनीष मोरजकर या शिवसेनेच्या उमेदवार विजयी झाल्या तर त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले भाजप- आरपीआय ए - रासप व शिवसंग्राम महायुतीचे उमेदवार श्रीकांत भिसे यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली.
निवडणूक आयुक्तांकडे आपला उमेदवारीअर्ज सादर करताना सादर करावयाच्या प्रमाणपत्रांपैकी आयोगाने स्वछ भारत अभियानांतर्गत शौचालयाचा वापर करीत असल्याचे प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक केले आहे सौ मोरजकर यांनी महानगरपालिकेच्या एल कुर्ला विभागाकडून परमिट केलेले शौचालय वापराचे प्रमाणपत्र उमेदवारी अर्ज सादर करावयाच्या अखेरच्या दिवशी सादर केले. हे प्रमाणपत्र मिळविताना तसेच अन्य कागदपत्रांवर त्यांनी आपला राहण्याचा पत्ता ईमारत क्रमांक 54/1735 समृध्द को ऑप हौ सो लिमिटेड नेहरू नगर कुर्ला पूर्व मुंबई -24 असा दिला आहे मात्र या पत्त्यावरील इमारतच सन २०१२ पासून अस्तित्वात नसल्याची तक्रार भिसे यांनी केली आहे.
सदर पत्त्यावरील चार मजली इमारत अस्तित्वात होती मात्र मागील चार ते पाच वर्षांपासून हि इमारत पुनर्विकासासाठी जमीनदोस्त करण्यात आली असून या ठिकाणी मोरजकर किंवा त्या इमारतीमधील अन्य कोणीही राहत नसल्याचे भिसे यांनी सांगितले याचा पुरावा म्हणून भिसे यांनी सौ मोरजकर यांचे आधारकार्ड रेशनिंग कार्डची झेरॉक्स , म्हाडाच्या annexture ३ च्या पत्रासह अन्य कागदपत्रे आपल्या तक्रार अर्जासोबत जोडली आहेत .
प्रवीणा मोरजकर या अन्य ठिकाणी राहत असतानाही त्यांना आपल्या जुन्य पत्त्यावरील शौचालय वापरात असल्याचे महानगरपालिका एल विभागाला कळविणे किंवा महागरपालिकेनेही कसलीही शहानिशा न करता वास्तव्याचा पुरावा \ ओळखपत्र , कनिष्ठ अवेक्षकाचा स्थळ पाहणी अहवाल, शौचालयाचा फोटो, तसेच पर्यवेक्षकाचा अभिप्राय ग्राह्य धरून एल विभाग सहाय्यक आयुक्तांनी शौचालय वापराचे प्रमाणपत्र देणे या बाबी गंभीर असून खोटी माहिती दिल्याबद्दल मोरजकर यांच्याविरुद्ध मुंबई महानगरपालिका अधिनियम १९८८ कलम ३३ नुसार त्यांचे नगरसेवक पद रद्द करावे तसेच कसलीही शहानिशा न करता हे प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यांना दोषी धरून त्यांच्यावरही कारवाई करावी अशी मागणी भिसे यांनी केली आहे यासंदर्भात लवकरच उच्च न्यायालयात जाणार असल्याचे त्यांनी सांगितले .