मुंबई दि. ३० – राज्यातील असंघटीत कामगारांसाठी स्थापन करण्यात येणारे सुरक्षामंडळ सर्वंकष व्हावे यासाठी एक अभ्यासगट स्थापन करावा अशी मागणी आमदार आशिष शेलार यांनी केली ती कामगार राज्यमंत्री संजय देशमुख यांनी मान्य केली.
राज्यातील असंघटीत कामगारांसाठी स्थापन करण्यात येणाऱ्या असंघटीत कामगार कल्याणकारी मंडळ याची चर्चा लक्षवेधी सुचने मार्फत आमदार सुरेश हलवणकर यांनी उपस्थित केली होती. त्याबाबत माहिती देताना कामगार मंत्र्यांनी सांगितले की, केंद्र शासनाने असंघटीत कामगारांसाठी असंघटीत कामगार सामाजिक सुरक्षा अधिनियम, २००८ पारित केला असून या अनुषंगाने असंघटीत कामगारांसाठी राज्यस्तरावर सामाजिक सुरक्षा मंडळाची स्थापना व नियमांची आखणी करणेबाबत केंद्र शासनाने कळविले होते. उपरोक्त सूचनेनुसार महाराष्ट्र असंघटीत कामगार सामाजिक सुरक्षा नियम, २०१३ ची अधिसूचना दि.३०.०५.२०१३ रोजी निर्गमित करण्यात आली. केंद्र शासनाच्या उपरोक्त अधिनियमास अनुसरून राज्य शासन स्तरावर विविध क्षेत्रातल्या असंघटीत कामगारांसाठी एकच सामाजिक सुरक्षा मंडळ गठीत करण्याची बाब विचाराधीन आहे. सदर मंडळाचे गठन झाल्यानंतर मंडळाच्या उत्पन्न स्त्रोत्राबाबत असंघटीत कामगार सामाजिक सुरक्षा अधिनियम २००८ च्या कलम ४ आणि ७ ला अनुसरून निर्णय घेण्यात येईल. दि. २०.०४.२०१६ रोजी अर्थमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत सदर मंडळ सर्वसमावेशक असून त्यात यंत्रमाग कामगारांचा देखील समावेश असेल व मंडळामार्फत लागू केल्या जाणाऱ्या सर्व कल्याणकारी योजनांचा लाभ यंत्रमाग कामगारांना देखील लागू असणार आहे. महाराष्ट्र राज्य असंघटीत कामगार सामाजिक सुरक्षा मंडळ स्थापन करण्याची कार्यवाही करावी, असा निर्णय घेण्यात आला. असंघटीत कामगार सामजिक सुरक्षा मंडळ, असंघटीत कामगारांसाठी विविध सामाजिक सुरक्षा योजना राबविणार असून सदर मंडळ गठीत करण्याची कार्यवाही शासनस्तरावर अंतिम टप्प्यात आहे.