महानिर्मितीच्या प्रकल्पग्रस्तांसाठी सर्वसमावेशक प्रगतकुशल योजना राबविणार - ऊर्जामंत्री - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 March 2017

महानिर्मितीच्या प्रकल्पग्रस्तांसाठी सर्वसमावेशक प्रगतकुशल योजना राबविणार - ऊर्जामंत्री

मुंबई, दि. 23 : वीज प्रकल्पांसाठी जमीन संपादन करण्यात आलेल्या प्रकल्पग्रस्तांपैकी आयटीआय अर्हताधारक नाहीत, परंतु कंपनीच्या सेवेत काम करण्याची इच्छा असलेल्यांसाठी सर्वसमावेशक प्रगतकुशल योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत दिली. 

या संदर्भात निवेदनाद्वारे माहिती देताना उर्जामंत्री म्हणाले की, प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला कंपनीच्या सेवेत गुणवत्तेनुसार सामावून घेण्याचे धोरण आहे. प्रकल्पग्रस्त आयटीआय अर्हताधारक आहेत पण कंपनीच्या भरतीत स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून गुणवत्तेनुसार अजूनही सामावून घेतले जाऊ शकले नाहीत, अशा प्रकल्पग्रस्त उमेदवारांसाठी प्रगतकुशल प्रशिक्षणार्थी योजना राबविली जाते.

या योजनेत बी. ई, डिप्लोमा इंजिनियरिंग-कुशल श्रेणीसाठी 10 हजार रुपये, वाहन चालक, नर्स, फार्मासिस्ट, पदवीधर, पदव्युत्तर पदवी, आय.टी.आय- कुशल श्रेणी 7 हजार 500 रुपये, नववी ते बारावी अर्धकुशल 6 हजार 500 रुपये, पहिली ते आठवी- अकुशल- 6 हजार रुपये निर्वाहभत्ता प्रतिमाह देण्यात येतो.

प्रशिक्षणार्थींना दरवर्षी 500 रुपये मानधनात वाढ देण्यात येईल. श्रेणीनिहाय कामाचा तपशील महानिर्मितीच्या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात येणार आहे. सर्वसमावेशक प्रगतकुशल योजना फक्त महानिर्मितीच्या प्रकल्पग्रस्तांकरीता लागू राहणार आहे. कुशल, अर्धकुशल व अकुशल प्रशिक्षणार्थीनी प्रशिक्षण कालावधीत समाधानकारकरीत्या पूर्ण केल्यानंतर प्रतिवर्षी 5 गुण याप्रमाणे कमाल 25 गुण याप्रमाणे देण्यात येतील.

महानिर्मितीच्या खुल्या भरतीद्वारे स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून रिक्त पदे भरण्यात येतील. त्यावेळी सदर प्रकल्पग्रस्त प्रगतकुशल प्रशिक्षणार्थींना त्याने प्राप्त केलेल्या गुणांचा वाढीव लाभ देण्यात येईल. या योजनेअंतर्गत प्रकल्पग्रस्त प्रशिक्षणार्थीना रुजू झाल्याच्या दिनांकापासून ते कंपनीच्या विविध पदांवर स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून गुणवत्तेनुसार सेवेत दाखल होईपर्यंत किंवा वयाची 58 वर्षे पूर्ण करेपर्यंत निर्वाह भत्ता दिला जाईल. सदर योजनेकरिता नियंत्रण अधिकारी सुरक्षा विषयक मार्गदर्शक तत्वे, अटी व शर्ती याबाबतचा तपशील प्रशासकीय परिपत्रकाद्वारे महानिर्मिती संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. सर्वसमावेशक प्रगतकुशल योजना अंमलात आल्यानंतर पूर्वीची आयटीआय अर्हताधारकासाठी कंपनीची असलेली प्रगतकुशल योजना या योजनेमध्ये समाविष्ट करण्यात येईल, असेही बावनकुळे यांनी निवेदनात म्हणाले.

Post Bottom Ad