पेंग्विन दर्शनासाठी शुल्क आकारणीचा निर्णय अद्याप नाही - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

31 March 2017

पेंग्विन दर्शनासाठी शुल्क आकारणीचा निर्णय अद्याप नाही

मुंबई / प्रतिनिधी - मुंबई महापालिकेच्या भायखळा वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयात पेंग्विन दर्शनासाठी शुल्क आकारणीचा निर्णय अद्याप घेण्यात आला नसल्याने मुंबईकरांना पेंग्विनचे दर्शन राणीच्या बागेतील प्रवेश शुल्कातच देण्यात येणार आहे. 

१७ मार्च रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत वीर जिजामाता प्राणिसंग्रहालयातील हम्बोल्ट पेंग्विन कक्षाचे लोकार्पण झाले. त्यानंतर राणीच्या बागेत पेंग्विन पाहण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे. सुट्टीच्या दिवशी गर्दी मोठ्या संख्येने वाढत असल्याने अनेकांना पेंग्विन पाहता आलेले नाहीत. 

३१ मार्चपर्यंत पेंग्विन मोफत पाहता येतील अशी घोषणा करण्यात आली होती. १ एप्रिलपासून मोठ्याना १०० आणि लहान मुलांना ५० रुपये दर आकारण्यात येणार येतील तसेच राणीबागेत प्रवेश शुल्क वाढवण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. दरवाढ केल्यास निवडणुकीत याचे वाईट परिणाम होतील म्हणून सर्वच राजकीय पक्षांनी पेंग्विन पाहण्यासाठी शुल्क आकारायला तसेच प्रवेश शुल्क दरवाढीला विरोध केला आहे.

दरम्यान याबाबतचा प्रस्ताव पुन्हा स्थायी समितीसमोर सादर करण्यात आला आहे. स्थायी समितीच्या बैठकीत पालिकेचा सन २०१७-१८ चा अर्थसंकल्प सादर करण्यात आल्याने या प्रस्तावावर चर्चा करण्यात आलेली नाही. त्यामुळे राणीच्या बागेतील मोठ्यांसाठी ५ रुपये लहान मुलांसाठी २ रुपये या प्रवेश शुल्कातच पेंग्विनदर्शन घेता येणार आहे. प्रस्तावावर पुढील आठवड्याच्या स्थायी समितीत चर्चा होणार असल्याने या बैठकीत तिकिटासाठी किती दार आकारावा याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

पेंग्विन पाहण्यासाठीचे अधिकृत दर निश्चित करण्याबाबत अद्याप आम्हाला कुठल्याही प्रकारचे आदेश महापालिका प्रशासनाकडून देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे राणीच्या बागेसाठी आकारण्यात येणाऱ्या पाच आणि दोन रुपये शुल्कातच मुंबईकरांना पेंग्विन पाहता येणार आहेत. पेंग्विन पाहण्यासाठी प्रचंड गर्दी उसळत असून मुंबईकरांनी सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करावे.
– डॉ. संजय त्रिपाठी (संचालक, वीर जिजामाता प्राणिसंग्रहालय)

Post Bottom Ad